Sharon Raj murder case: केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील नेयट्टींकारा सत्र न्यायालयाने २४ वर्षीय तरुणी ग्रीष्माला तिचा प्रियकर शेरॉन राजच्या खुनासाठी दोषी ठरवलं. ग्रीष्मा आणि शेरॉन राज हे २०२२ पासून प्रेमसंबंधात होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर ग्रीष्मानं विषप्रयोग करत शेरॉनला संपवलं. शनिवारी या प्रकरणात ग्रीष्माला शिक्षा सुनावणी जाणार आहे. दरम्यान ग्रीष्माची आई सिंधूला निर्दोष सोडलं आहे. तर तिचे काका निर्मलाकुमारण नायरला ग्रीष्माची मदत केल्याबद्दल दोषी ठरविले आहे.
फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारीला राहणारी ग्रीष्मा आणि तिरुवनंतपुरम मधील परसला येते राहणारा शेरॉन राज यांच्यात २०२१ पासून प्रेमसंबंध होते. मार्च २०२२ मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबियांनी तिचे लग्न सैन्य अधिकाऱ्याशी ठरविले. ग्रीष्मानेही यासाठी मान्यता दिली. फिर्यादींनी म्हटले की, लग्न ठरल्यानंतरही ग्रीष्मानं शेरॉनशी संबंध तोडले नव्हते. मात्र जेव्हा लग्नाची तारीख जवळ यायला लागली, तेव्हा तिनं शेरॉनला मारण्याची योजना आखली.
फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, पेनकिलर गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो, याची माहिती ग्रीष्मानं इंटरनेटवर शोधली होती आणि शेरॉनवर विषप्रयोग करण्याचा तिनं अनेकदा प्रयत्न केला. एकदा तिनं पाण्यात अनेक गोळ्या मिसळून, ते शेरॉनला पिण्यासाठी दिलं होतं. तर ज्यूसमध्येही गोळ्या टाकून शेरॉनला पिण्यासाठी दिल्या होत्या. पण छोट्या डोसचा काही परिणाम होत नसल्याचे पाहून तिनं शेरॉनला जास्त ज्यूस पिण्याचंही आव्हान दिलं होतं. पण यातूनही तो सुरक्षित बचावल्यानंतर ज्यूसमध्ये वेगळं काही तरी मिसळावे, असा विचार ग्रीष्मानं केला.
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी ग्रीष्माच्या लग्नाला एक महिना बाकी असताना तिनं शेरॉनला तिच्या घरी बोलावलं आणि त्याला आयुर्वेदिक काढा प्यायला दिला. या काढ्यात तिनं तणनाशक मिसळल्याचा आरोप फिर्यादींनी केला. आयुर्वेदिक काढा हा कडू असतो, हे मानून त्यात शेरॉनला काही वावगं वाटलं नाही. ग्रीष्माच्या घरून निघाल्यानंतर शेरॉनची प्रकृती खालावली. त्याला अस्वस्थ वाटून उलट्या होऊ लागल्या. ज्यामुळं त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं.
२५ ऑक्टोबर रोजी २३ वर्षीय शेरॉनचा तिरुवनंतपुरममधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी शेरॉननं आपल्या मित्राशी बोलताना ग्रीष्मानं काहीतरी संशयास्पद प्यायला दिल्याचं सांगितलं. तसेच तिनं आपल्याला फसवलं, असंही तो म्हणाला. शेरॉनच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
ग्रीष्माला ३१ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये तिला जामीन मिळाला. या गुन्ह्यात ग्रीष्माची आई आणि तिच्या काकालाही अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात मदत करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला गेला. पोलिसांच्या चौकशीत ग्रीष्मानं सांगितलं की, लग्न ठरल्यानंतर तिनं शेरॉनला संबंध तोडण्यास आणि फोनमधील खासगी क्षणाचे फोटो डिलीट करण्यास सांगितले होते. पण तरीही शेरॉन फोटो आणि व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीबरोबर शेअर करेल, अशी भीती तिला वाटत होती. यातूनच तिनं त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला.