Kerala Crime News : केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक जीएसटी अधिकारी आणि त्यांची आई व बहीण केरळच्या कक्कनड येथे त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर माहिती देताना सामूहिक जीवन संपवण्याचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

मनीष विजय असं या व्यक्तीचं नाव आहे. ते जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त होते अशी माहिती सांगितली जात आहे. ते चार दिवसांच्या सुट्टीवर होते. मात्र, सुट्टी संपल्यानंतर देखील ते कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन केला. मात्र, फोनवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मनीष विजय यांच्या घरी जाऊन पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील मृतदेहामध्ये मनीष विजय (४४), त्यांची बहीण शालिनी (३५) आणि त्यांची आई शकुंतला यांचा समावेश आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, मनीष विजय जेव्हा सुट्टी संपल्यानंतरही कामावर हजर झाले नाही तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी त्यांच्या घरी भेट दिली तेव्हा घरातून दुर्गंधी येत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीतून पाहिलं असता त्यांना एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता आणखी दोन मृतदेह आढळून आले. त्यामध्ये मनीष आणि त्यांची बहीण शालिनी यांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, तर त्यांची आई शकुंतला यांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला.

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, झारखंडमधील हे कुटुंब दीड वर्षापासून क्वार्टरमध्ये राहत होते. तसेच त्यांचा शेजारी राहणाऱ्यांबरोबर कमीत कमी संवाद असायचा. दरम्यान, पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत वृद्ध महिला म्हणजे जीएसटी अधिकाऱ्याच्या आईचा मृतदेह पोलिसांना आढळला. हा काही कटाचा भाग आहे की त्यांनी आपलं जीवन संपवलं? या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.

Story img Loader