NCERT Books Name : देशात सध्या हिंदी भाषेवरून दक्षिणेकडील राज्यांचा केंद्र सरकारशी संघर्ष चालू आहे. अशातच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) त्यांच्या नवीन इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांना रोमन लिपीत हिंदी नावं दिली आहेत. यामध्ये इंग्रजी पुस्तकांचाही समावेश आहे. पुस्तकांना हिंदी शीर्षके दिल्यामुळे केरळमध्ये वाद चालू झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा प्रकार आहे. एनसीईआरटीची ही कृती हिंदीतर (बिगर हिंदी) भाषिक राज्यांमध्ये हिंदीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दिसतोय. तमिळनाडू सरकारने आधीच पाठ्यपुस्तकांना विरोध केला आहे.
उदाहरणार्थ इयत्ता सहावीचं इंग्रजी पाठ्यपुस्तक पूर्वी हनीसकल या नावाने ओळखलं जात होतं. आता त्या पुस्तकाला ‘पूर्वी’ असं नाव देण्यात आलं आहे. ‘पूर्वी’ हा हिंदी शब्द असून पूर्व दिशेच्या अर्थाने वापरला जातो. हा शास्त्रीय संगीतातील एक राग देखील आहे. इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकाला मृदुंग आणि तिसरीच्या पुस्तकाला संतूर असं नाव देण्यात आलं आहे. ही दोन्ही भारतीय वाद्ये आहेत. गणिताच्या पुस्तकासंदर्भातही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. सहावीच्या गणिताच्या पुस्तकाला पूर्वी मॅथेमॅटिक्स असं नाव होतं, जे आता गणित नावाने प्रकाशित करण्यात आलं आहे.
इंग्रजी पुस्तकांना काय नावं दिली आहेत?
दरम्यान, केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी एनसीईआरटीच्या या निर्णयाला विरोध केला आहे. इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना हिंदी शीर्षके देण्याच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली. हा तर्कहीन निर्णय असल्याचं शिवनकुट्टी यांनी म्हटलं आहे. अनेक दशकांपासून प्रचलित असलेल्या इंग्रजी शीर्षकांऐवजी मृदुंग व संतूरसारख्या हिंदी शीर्षकांचा वापर करणे हा अन्याय आहे. केरळच्या भाषिक विविधतेचं जतन करण्याच्या, प्रादेशिक व सांस्कृतिक स्वायत्ततेला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या विरोधात आहे.
मंत्री शिवनकुट्टी म्हणाले, “इंग्रजी शीर्षके विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व समज वाढवतात. मात्र, एनसीईआरटी हिंदी शीर्षके लादत आहे. एनसीईआरटीचा हा निर्णय संघराज्यीय तत्त्वे व संवैधानिक मूल्यांना कमजोर करणारा आहे. एनसीआरटीने त्यांच्या निर्णयाचा आढावा घेऊन तो मागे घ्यावा. तसेच शिवनकुट्टी यांनी इतर राज्यांना एनसीईआरटीच्या या निर्णयाविरोधात, हिंदी लादण्याविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.