Kerala firm made employees crawl on their knees : केरळमधील एका खाजगी मार्केटिंग कंपनीत वाईट कामगिरी करणाऱ्या कर्मचार्यांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचार्यांना कथितपणे दोरीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर रांगण्यास आणि जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडल्याची बाब समोर आले आहे. खाजगी कंपनीवर हे आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान स्थानिक वृत्त वाहिन्यांनी या प्रकाराचे व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर राज्य कामगार विभागाने कामाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या अशा अपमानास्पद वागणुकीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्याचे कामगार मंत्री व्ही, शिवनकुट्टी यांनी देखील या घटनेच्या चौकशीचे तसेच जिल्हा कामगार अधिकार्यांना तात्काळ घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मार्केटिंग फर्ममधील समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोरी वापरून एका व्यक्तीला कुत्र्याप्रमाणे जमिनीवर रांगायला भाग पाडताना दिसत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचार्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की जेव्हा ते त्यांचे टार्गेट पूर्ण करू शकले नाहीत तेव्हा कंपनीच्या व्यवस्थापनाकडून त्यांना ही अपमानास्पद शिक्षा देण्यात आली.
पोलीस काय म्हणाले?
पोलीस अधिकार्यांनी सांगितले की ही घटना पेरूम्बवूर येथील एका फर्ममध्ये घडली आहे. ही फर्म कलूरमधील एका कंपनीच्या उत्पादनाचे मार्केटिंग आणि विक्री करते. तसेच पोलिसांनी त्यांना या प्रकारणात अद्याप तक्रार मिळाली नसल्याचे म्हटले आहे. याबरोबरच फर्मच्या मालकाने कंपनीशी संबंधित व्हिडीओबाबतचे आरोपही फेटाळले आहेत. “अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि तपास सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले.
उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग (Kulathoor Jaisingh) यांच्या तक्रारीनंतर राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर केरळ स्टेट युथ कमिशनने या प्रकरणात हस्तक्षेप केला असून कामगारांचा छळ झाल्याच्या प्रकरणात एक वेगळी तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना या प्रकरणी रिपोर्ट सादर करण्याचे आणि या प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.