सायली पाटील
Kerala Floods. आफत, प्रलय, महापूर, त्रासदी, भयंकर, धक्कादायक, हृदयद्रावक अशा विविध आणि तितक्याच चिंतातूर करणाऱ्या शब्दांचा वापर गेल्या महिनाभरापासून कानावर पडत होता. किंबहुना सध्याही हे शब्द कानांवर पडत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे केरळमध्ये आलेल्या महापूराचं. शतकातील सर्वात मोठा पूर म्हणून या आपत्तीकडे पाहिलं जात आहे. मुख्य म्हणजे देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या या सुंदर राज्यातील रहिवाशांच्या मनातही या पूराविषयी पुसटशी कल्पना आली नसेल. सर्वाधिक साक्षरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या राज्याची आपली अशी एक शान. पण, या साऱ्याला कुठेतरी गालबोट लागलं आणि होत्याचं नव्हतं झालं.
वरुणराजा आणि केरळ यांची तशी गट्टी. पण, हाच वरुणराजा न जाणे का, पण केरळवर रुसला आणि एका अर्थी त्याची अवकृपाच झाली. बघता बघता राज्यातील धरणं भरुन वाहू लागली आणि त्यांच्यातील पाणी केरळच्या लहान गावांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली. रस्ते, चावड्या, विमानतळं, शेतं सारं सारं काही या पाण्याच्या प्रवाहाने गिळंकृत करत टप्प्याटप्प्याने केरळचं रुपडं बदलून टाकलं.
पावसाचा थेंब तुटत नसल्यामुळे आता करावं तरी काय, असाच प्रश्न इथल्या स्थानिकांच्या मनात घर करत होता. प्रत्येक क्षणाला पाण्याची वाढती पातळी जणू मृत्यूच्या दरीतच लोटते की काय, असे विचारही कोणाच्या मनात घर करुन गेले, तर, याची कल्पना नसणाऱ्या कित्येकांना या पूरात आपले प्राण गमवावे लागले. पूराच्या पाण्यात सर्वकाही जलमय झालं आणि अक्षरश: त्या पाण्यासोबत असंख्य आशा, आकांक्षा, स्वप्नही वाहून गेली. एक गोष्ट मात्र केरळवासियांच्या मनात अशी काही घर करुन राहिली की जी कोणतीच आपत्ती आणि निसर्गाची खेळी त्या ठिकाणहून हलवू शकली नाही. ती म्हणजे इथल्या स्थानिकांच्या मनात असणारी जिद्द आणि एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची वृत्ती.
केरळमध्ये आलेल्या पूरानंतर नुकसानाचा आकडा इतका मोठा दिसू लागला की खुद्द मुख्यमंत्री पी. विजयन यांनीच सर्वांना आपल्या राज्याला मदत करण्याचं आवाहन करावं लागलं. विविध मार्गांनी विजयन यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनीच आपल्या उपचारासाठी साठवलेले पैसे, मुलीच्या लग्नासाठी साठललेले पैसे, आतापर्यंतच्या कमाईचा काही भाग देत आणि इतरही बहुविध मार्गांनी सढळ हस्ते मदत केली. ही दानशूर वृत्ती पाहून फक्त स्थानिकच नव्हे, काही क्षणांसाठी मलाही हेवा वाटला. म्हणजे ना ओळख ना पाळख, पण मदतीची गरज आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा जणू अंतर्मनातूनच साद येते आणि मग मागचापुढचा विचारही न करता हे हात पुढे येतात.
Kerala floods: देवाक् काळजी! ‘अमूल’कडून देवभूमीसाठी अनोखी साद
केरळच्या मदतीसाठी आलेल्या या प्रत्येकांचेच विजयन यांनी आणि पूरग्रस्तांनी आभार मानले. सध्या केरळमध्ये पूर आला नसता तर या घडीला ओणम या सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असता. बळीराजा या सणाच्याच पर्वादरम्यान वामनरुपी विष्णूने दिलेल्या वरदानामुळेच आपल्या राज्यातल्या लोकांची भेट घेण्यासाठी म्हणून येतो. त्याच निमित्ताने म्हणे हे आनंदपर्व साजरा केलं जातं. पण, हे पर्व यंदा मात्र साजरा होणार नाही. असं असलं तरीही या संपूर्ण आपत्तीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी त्या पूराच्या पाण्यातून वाट काढत मदतीचा ओघ पोहोचवला तेच जणू या बळीराजाच्या रुपात आपल्याला तारण्यासाठी, खुशाली विचारण्यासाठी आले, अशीच इथल्या स्थानिकांची भावना आहे. त्यामुळे ‘आज म्या देव पाहिला…’ असंच म्हणत केरळमधील पूरग्रस्त कोणा एका अदृश्य शक्तीला नमन करण्यासोबतच संकटसमयी धावून आलेल्या प्रत्येकातच देव शोधत आहेत.
तुम्ही कधी देव किंवा एखादी अदृश्य, अविश्वसनीय शक्ती पाहिली आहे का, असा प्रश्न विचारला असता सहसा समोरची व्यक्ती काही क्षण निरुत्तर असते. पण, केरळवासियांच्या बाबतीत मात्र तसं होणार नाही. कारण, स्थानिक मासेमार, लंगर चालवण्यासाठी म्हणून आलेले शीख बांधव, नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवक संस्था, स्वत:च्या घराचं दार खुलं करुन देणारा अभिनेता, गर्भवती सुजीताला जणू दुसरं आयुष्य बहाल करणारे नौदल अधिकारी विजय वर्मा ही सर्व मंडळी त्यांच्यासाठी एखाद्या देवाप्रमाणे किंवा मग ओणमच्या निमित्ताने जणू भेटीला आलेल्या बळीराजाप्रमाणेच होती किंबहुना आहेत.
काही हिरो, दैवी शक्ती किंवा काही व्यक्ती डोक्यावर कोणत्या मुकूटाशिवाय आपल्यासमोर येता आणि त्यांचं मोठेपण दाखवून जातात, असं म्हणत केरळवासियांनी इथल्या मासेमारांनी डोक्यावर उचलून घेतलं. समुद्राशी घनिष्ट नातं असलेल्या या मासेमारांनीही बचावकार्यात मागचापुढचा विचार न करता उडी घेतली आणि त्यांच्या मनाच्या श्रीमंतीने कोट्यधीशांचेही डोळे दीपले. ही सर्व परिस्थिती दूरून पाहूनही जणू त्याच्याशी प्रत्येक वेळी आपण जोडले जात आहोत, अशीच अनुभूती होत होती.
Kerala Floods : धोका टळला, आता आवाहन केरळचं पुनर्निमाण करण्याचं – पी. विजयन
ओणमचं मंगलपर्व यंदा साजरं होणार नाही, फुलांच्या भव्य आणि लक्षवेधी रांगोळ्यांची सजावट असणार नाही असं फक्त केरळ राज्याशासनानेच नव्हे तर देशातील मल्याळम भाषिक समुदायाच्या इतरही संघटनांकडून या निर्णयाला दुजोरा दिला. कला, संस्कृती आणि भक्ती अशा विविध पैलूंची रचना असणाऱ्या या सणाचा आनंद यंदा काहीसा ओसरलेलाच असेल. पण, असं असलं तरीही माणसात दडलेल्या सेवाभावी वृत्तीने आज या प्रसंगाचं महत्त्वं वाढवलंच आहे, असं म्हणत लोक कल्याण मल्याळी असोसिएशनचे अध्यक्ष विजयन नायर यांनी आपली भूमिका मांडली. यंदा ओणमच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम रद्द केल्याचंही त्यांनी सांगितलं.
केरळमध्ये झालेलं नुकसान आपल्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं नुकसान असून आता त्या व्यक्तीला पुन्हा मोठ्या धीराने उभं करण्यासाठी म्हणून काय करता येईल या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मन गटांगळ्या खात होतं. अर्थात उत्तर सापडलं, पण या माणसांत दडलेल्या अद्वितीय व्यक्तींच्या मनाची, त्यांच्या वृत्तीची श्रीमंती पाहून, आणि केरळातील मंडळींना असणारी उपकारांची जाणिव पाहता खरंच देव आहे यावर नकळत का होईना पण पुन्हा एकदा विश्वास बसला.
sayali.patil@loksatta.com