Kerala Government : पती-पत्नी दोघेही आयएएस अधिकारी किंवा एक आयएएस आणि एक आयपीएस अधिकारी असणं यात काही नवल नाही. असे अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळातात. मात्र, केरळमध्ये एक आगळा वेगळा आणि अभूतपूर्व क्षण पाहायला मिळाला आहे. केरळमध्ये पहिल्यांदाच आपल्या पतीच्या जागी मुख्य सचिवपदी पत्नी विराजमान झाली आहे. केरळचे मुख्य सचिव डॉ.व्ही.वेणू हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे सोपवली.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शारदा मुरलीधरन यांच्या मुख्य सचिवपदाच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. यामुळे केरळमध्ये एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. आता शारदा मुरलीधरन यांनी त्यांचे पती डॉ.व्ही.वेणू यांच्या जागी राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला असल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.
या योगायोगावर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलं की, “केरळमध्ये पती आणि पत्नी दोघेही उच्च पदावर असल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. मात्र, पतीची जागा पत्नीने घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.” दरम्यान, डॉ.व्ही.वेणू आणि शारदा मुरलीधरन हे दोघेही १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
For the first time in India (at least as far as anyone can remember!), Kerala’s outgoing ChiefSecretary, Dr V, Venu, handed over the CS’s post to his wife, Sarada Murlidharan, at a formal handover ceremony at the secretariat in Thiruvananthapuram. Both are IAS officers of the… pic.twitter.com/E0nZmDDIWi
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 1, 2024
शारदा मुरलीधरन यांनी काय म्हटलं?
शारदा मुरलीधरन यांनी त्यांचे पती डॉ.व्ही.वेणू यांच्या जागी राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मुख्य सचिवांच्या कार्यशैलीचे बारकाईने निरीक्षण करण्याची संधी मिळाली आहे. हे आपलं भाग्य आहे. हा एक अभूतपूर्व क्षण आहे. मात्र, आता थोडी चिंताही आहे. कारण मला त्याच्या निवृत्तीनंतर आणखी आठ महिने सेवेत राहायचं आहे. कारण आम्ही २४ वर्षे प्रशासनामध्ये सेवा केली, एकत्र काम केलं.”
शारदा मुरलीधरन यांनी याआधी अनेक महत्वाच्या पदावर काम केलेलं आहे. यापूर्वी अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन आणि आर्थिक व्यवहार) म्हणून काम पाहिलं. आता राज्याच्या मुख्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे. दरम्यान, या अनोख्या योगायोगाची काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे की, “भारतात प्रथमच केरळचे मुख्य सचिव डॉ.व्ही. वेणू यांनी त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली.”