केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या ९ विद्यापीठांच्या कुलगुरूंना राजीनामे देण्याचा आदेश दिल्यानंतर या वादाने टोक गाठले होते. राज्यपालांच्या या आदेशानंतर विजयन यांनी आरिफ खान यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. आरिफ खान संघाची व्यक्ती असल्यासारखे करत आहेत. राज्यातील विद्यापीठांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्र बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप विजयन यांनी केला आहे. त्यानंतर आता राज्यपाल खान यांनी विजयन यांना थेट आव्हान दिले आहे. माझ्या अधिकाराचा वापर करून मी संघाच्याच नव्हे तर माझ्या परिचयाच्या एकाजरी माणसाची नियुक्ती केली असेल, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे आरिफ खान म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> केरळमध्ये राजकारण तापलं, RSS चा उल्लेख करत मुख्यमंत्री विजयन यांची टीका, राज्यपालांना म्हणाले “तुम्ही तर संघाचे प्यादे”
“मी संघाच्या लोकांना विद्यापीठात आणण्यासाठी कुलगुरुंवर कारवाई करत आहे, असे विजयन म्हणत आहेत. मी माझ्या अधिकाराचा वापर करून फक्त संघाच्याच नव्हे तर अन्य कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केली असेल, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र विजयन हे सिद्ध करू शकले नाहीत, तर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का?” असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर
पिनपायी विजयन काय म्हणाले होते?
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळमधील ९ विद्यापीठांच्या कुलगुरूंना राजीनामे देण्याचा आदेश दिला होता. राज्यपालांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री पिनरायी विजयन चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यपाल हे संघाचे प्यादे असल्यासारखे वागत आहेत. ते संघाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, अशी टीका विजयन यांनी केली होती. “राज्यपाल हे पद सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी नाही. तर या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे संविधानाचा सम्नान राखण्याची जबाबदारी असते. राज्यपालांनी दिलेला आदेश हा असंविधानिक असून कुलगुरूंच्या अधिकारांवर ते गदा आणत आहेत,” असे विजयन म्हणाले होते.