राज्यपाल केंद्र सरकारची राजकीय भूमिका राबवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांची सरकारं असणाऱ्या राज्यांमधील सत्ताधारी करत असल्याचं दिसून आलं आहे. अजूनही यासंदर्भात काही खटले सर्वोच्च न्यायालयात व देशाच्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व राज्यपाल वाद चर्चेचा विषय ठरला असतानाच केरळमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. काही आंदोलकांनी अचानक राज्यपालांच्या ताफ्यात त्यांच्या गाडीसमोर येत घोषणा दिल्यानंतर स्वत: राज्यपाल खाली उतरून आंदोलकांशी भांडायला पुढे सरसावले. अडून बसले. शेवटी १७ आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तिथून निघाले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
हा सगळा प्रकार केरळमधल्या कोल्लम भागात घडला. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान एका कार्यक्रमासाठी कोल्लम भागात जात होते. मात्र, निलामेल भागात काही एसएफआय अर्थात माकपच्या विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी देत होते. काळे झेंडे दाखवत होते. राज्यपाल विद्यापीठातील सिनेटमध्ये संघ परिवाराच्या व्यक्तींना नेमत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात होता.
राज्यपालांचा ताफा येताच काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीसमोर उडी घेतली. राज्यपालांची गाडी तातडीने थांबली. रागात राज्यपाल खान खाली उतरले आणि त्यांनी आंदोलकांशी भांडायला सुरुवात केली. राज्यपालांच्या दौऱ्यावर तैनात असणाऱ्या पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल संतापात पोलिसांवर पक्षपातीपणे कारवाई करत असल्याचा दावा करत होते.
कारवाईशिवाय हलणार नाही!
आंदोलकांवर कारवाई करण्याचे आदेश मानले जात नसल्याचं पाहून राज्यपाल खान तिथेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका दुकानाबाहेर एक खुर्ची टाकून तिथे बसून राहिले. कारवाई होईपर्यंत इथून हलणार नसल्याचं म्हणत राज्यपाल अडून बसले. शेवटी पोलिसांनी १७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याचं पत्र राज्यपालांना वाचून दाखवल्यानंतर राज्यपाल तिथून निघाले. तोपर्यंत या सगळ्या नाट्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राज्यपालांना झेड प्लस सुरक्षा
दरम्यान, स्थानिक पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करत राज्यपालांनी थेट राज्य सरकारवर व मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. अखेर राज्यपालांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुकानाबाहेर बसलेले असताना राज्यपाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयांमध्ये फोन लावण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना देत असल्याचं दिसून आलं.
“मी आधीच सांगितलंय की माझा दुरून काळे झेंडे दाखवण्यावर अजिबात आक्षेप नाही. पण जर कुणी माझ्या कारच्या जवळ आलं, तर मी खाली उतरेन. पोलिसांनी सांगितलं की आंदोलन करणारे १८ जण होते. माझा एकच प्रश्न आहे की जर मुख्यमंत्री या रस्त्यावरून जात असते, तर पोलिसांनी अशा प्रकारे आंदोलकांना त्यांच्या गाडीवर हल्ला करू दिला असता का?” असं राज्यपाल आरिफ खान म्हणाले.
सात आमदारांशी संपर्क, २५ कोटींची ऑफर आणि ईडी चौकशी; अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक दावा!
“मुख्यमंत्री बेबंदशाहीला प्रोत्साहन देतायत”
“मी याचा दोष पोलिसांना देत नाहीये. पोलीस त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री इथे बेबंदशाहीला प्रोत्साहन देत आहेत. कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्रीच देत आहेत”, अशी टीका राज्यपालांनी केली.
गेल्याच महिन्यात अशाच प्रकारे तिरुअनंतपुरममध्ये आंदोलक राज्यपालांच्या ताफ्यासमोर आले होते. तेव्हाही राज्यपालांनी अशाच प्रकारे खाली उतरून आंदोलकांना दमदाटी केली होती. गेल्या आठवड्यात विधानभवनात राज्यपालांचं अभिभाषण होतं. मात्र, राज्य सरकारशी असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी फक्त ८० सेकंदात त्यांचं अभिभाषण आटोपलं आणि ते तडकाफडकी तिथून निघून गेले.