सध्या देशात प्रार्थना स्थळांवरील भोंगे आणि इतर काही मुद्यांवर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारत देशाला जगात महाशक्ती व्हायचं असेल तर देशात परस्पर प्रेम, स्नेह, बंधुभाव आणि शांतता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शांततेचा भंग झाल्यास भारताला महाशक्ती बनण्यात मोठा अडथळा निर्माण होईल, असं मत आरीफ खान यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थितीती लावली होती. यावेळी त्यांनी काही निवडक प्रसार माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. भोंग्यांसह देशात सुरू असलेल्या इतर गलिच्छ राजकारणावर त्यांनी भाष्य व्यक्त केलं.

प्रसार माध्यमांनीही समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टींना थारा न दिल्यास देशातील ९९ टक्के प्रश्न सुटतील, अशा शब्दांत राज्यपाल खान यांनी प्रसारमाध्यमांना खडसावलं आहे. आपल्याला कितपत जाणीव आहे माहीत नाही, पण आगामी काळात भारत देश महाशक्ती बनेल, हे संपूर्ण जग ओळखून आहे. भारत देशाला जगात खरोखर महाशक्ती व्हायचं असेल, तर प्रथम देशात सामाजिक पातळीवर प्रेम, जिव्हाळा, स्नेह, बंधुभाव आणि शांतता अबाधित राहणं गरजेचं आहे. देशात शांतता भंग करणाऱ्या गोष्टी घडत असतील, तर ही बाब भारताला महाशक्ती बनण्यात मोठा अडथळा ठरू शकते, असंही ते यावेळी म्हणाले.

Story img Loader