एकीकडे सामाजिक विकासाच्या सर्वच निकषांवर विशेषत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांमधील विविध मापदंडांवर आघाडीवर असणाऱ्या केरळमधील लोकसंख्या संक्रमणावस्थेतून जात असल्याचे पुढे येत आहे. या राज्यातील लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असतानाच राज्यातील ‘वयस्कर’ लोकांची संख्या वाढत आहे. आणि यापुढेही लोकसंख्येतील ‘ज्येष्ठां’ची ही वाढ अशीच कायम राहण्याची चिन्हे एका सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहेत.
‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’ या संस्थेतर्फे केरळचे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. राज्यातील लोकसंख्या, त्या लोकसंख्येची वयानुसार विभागणी, विविध वयोगटांच्या व्यक्तींचे प्रमाण, त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर अशा घटकांचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. २०११ च्या जनगणनेनुसार केरळमधील एकूण लोकसंख्या ३ कोटी ३६ लाख असून त्यापेकी ‘ज्येष्ठ नागरिकां’चे प्रमाण १२.६ टक्के होते. मात्र या सर्वेक्षणात पुढे आलेल्या माहितीनुसार, साठी उलटलेल्या नागरिकांच्या लोकसंख्या वाढीचा दर २.३ टक्के असल्याचे पुढे आले आहे.
‘ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतील वाढीचा दर असाच कायम राहिला तर २०२१ ते २०३१ या कालावधीत राज्यातील युवा लोकसंख्येपेक्षा ज्येष्ठांची लोकसंख्या अधिक असेल’, असा इशाराच या सर्वेक्षणात देण्यात आला आहे. केरळमधील ३०० ठिकाणी, ७५८२ घरांमध्ये साठी उलटलेल्या व्यक्तींची संख्या सध्या १००२७ असल्याचे या सर्वेक्षणात पुढे आले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठांच्या संख्येत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. १९८१ पासून दरवर्षी केरळ राज्य साठी उलटणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत १० लाखांची भर घालत असल्याची बाबही सर्वेक्षणात पुढे आली आहे. तर ‘सहस्रचंद्र दर्शन’ झालेल्या अर्थात वयाची ८१ उलटलेल्या व्यक्तींची केरळमधील संख्या प्रतिवर्षी १ लाखाने वाढत आहे. त्यामुळे लवकरच केरळ हे ‘ज्येष्ठांचे राज्य’ ठरेल असा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
केरळ म्हातारे होतंय..
एकीकडे सामाजिक विकासाच्या सर्वच निकषांवर विशेषत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांमधील विविध मापदंडांवर आघाडीवर असणाऱ्या केरळमधील लोकसंख्या संक्रमणावस्थेतून जात असल्याचे पुढे येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-09-2014 at 02:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala growing old