Action Against Person for Insulting Tulsi: केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना एका प्रकरणातील आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण एका घरासमोरच्या तुळशीच्या रोपाचा अवमान केल्याचं आहे. एका घरासमोर तुळशीच्या रोपासाठी बांधण्यात आलेल्या चौथऱ्याचा अपमान आरोपीने केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्यासंदर्भात आज केरळ उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील आदेश दिले.
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. के. कुन्हीकृष्णन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. अॅलेपीमध्ये वास्तव्य करणारे ३२ वर्षीय श्रीराज आर ए यांच्या घरासमोरच्या तुळशी चौथऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला. अब्दुल हकीम नावाच्या व्यक्तीने तुळशीचा अवमान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला म्हणून श्रीराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात थ्रिसूरमधील गुरुवयूर पोलीस स्थानकात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या कलमाखाली श्रीराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय म्हटलं न्यायालयाने?
दरम्यान, न्यायालयाने श्रीराज यांना जामीन मंजूर केला असून पोलिसांना अब्दुल हकीमविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “तुळशी चौथऱ्याला हिंदू धर्मात पविस्तर स्थान आहे. सदर व्हिडीओत आरोपी हकीम तुळशीच्या रोपाचा अवमान करत असल्याचं दिसत आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावू शकतात. पण अब्दुल हकीमविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शिवाय तो गुरुवयूर मंदिर परिसरातील एका हॉटेलचा मालक असल्याचंही समोर आलं आहे. अशा वृत्तीची व्यक्ती बाहेर मोकाट फिरत असताना पोलिसांनी याचिकाकर्त्यालाच तुरुंगात डांबलं आहे”, असं न्यायमूर्ती म्हणाले.
दरम्यान, अब्दुल हकीमच्या वकिलांनी त्याच्या बचावामध्ये तो मानसिक रोगी असल्याचा दावा केला. मात्र, न्यायालयाने बचाव पक्षाचा हा दावा फेटाळून लावला. “जर हकीम मानसिक रुग्ण आहे, तर मग तो मंदिराच्या परिसरात व्यवसाय कसा करू शकतो?” असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच, “जर तो मनोरुग्ण आहे, तर मग त्याला वाहन चालवण्याचा परवाना कसा दिला गेला? याचीही चौकशी केली जायला हवी”, असंही न्यायालयाने यावेळी नमूद केलं.