पतीने ताकिद देऊनही पत्नीने संधी मिळताच रात्री उशिरा वारंवार दुसऱ्या पुरुषाला फोन करणं वैवाहिक क्रुरता असल्याचं मत केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या घटस्फोटाचा अर्ज फेटाळल्यानंतर पीडित पतीने या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं. तसेच पत्नीवर लग्नानंतर विवाहबाह्य संबंध सुरूच ठेवल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली. यावेळी पतीने पत्नीच्या फोन कॉल रेकॉर्ड न्यायालयात सादर केले.

नेमकं प्रकरण काय?

पीडित पतीने कौटुंबिक न्यायालयात पत्नीवर व्यभिचार आणि क्रुरतेचा आरोप करत घटोस्फोटाची मागणी केली. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. या अर्जात पतीने म्हटलं होतं, “पत्नीने लग्नानंतर सुरुवातीपासून त्याचं आयुष्य नरकाप्रमाणे बनवलं. पत्नीने अनेक प्रकारच्या अनैतिक कृती केल्या. लग्नाआधी देखील पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. लग्नानंतर देखील पत्नीने हे संबंध कायम ठेवले.”

पीडित पतीच्या वकिलांनी पत्नीवरील आरोपांचे पुरावे म्हणून बीएसएनएल कंपनीकडून देण्यात आलेले कॉल रेकॉर्डचे तपशील न्यायालयात सादर केले. तसेच त्यात पत्नी आणि आरोपी व्यक्तीमध्ये सातत्याने फोनवर बोलणं होत असल्याचं स्पष्ट होतं असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, पत्नीच्या वकिलांनी हे आरोप फेटाळत खूप कमी वेळा बोलणं होत असल्याचा दावा केला.

न्यायालयाने निकाल देताना नेमकं काय म्हटलं?

न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी या प्रकरणी निकाल देताना म्हटलं, “पत्नी केवळ दुसऱ्या पुरुषासोबत नियमितपणे बोलत होती यातून त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते असा निष्कर्ष काढता येणार नाही. व्यभिचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी तसे पुरावे असायला हवेत. शक्यतांचा विचार केला तरी पतीने आरोप करताना सादर केलेले पुरावे हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत.”

हेही वाचा : “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मी पहिलाच दलित नवरदेव जो…”; कडक पोलीस बंदोबस्तात निघाली वरात; ‘हे’ होतं कारण

“असं असलं तरी पत्नीने साक्ष देताना ती आरोपीसोबत केवळ कधीकधी फोनवर बोलत असल्याचं म्हटलं. मात्र, समोर आलेल्या कॉल रेकॉर्डवरून वेगळंच सत्य समोर आलंय. त्यामुळे पतीने केलेला क्रुरतेचा आरोप या ठिकाणी निदर्शनास येतो,” असंही एक सदस्यीय खंडपीठाने नमूद केलं.