Kerala Horror : केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत ६२ जणांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक दावा एका दलित समाजातील मुलीने केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाशी संबंधित ४४ जणांना अटक केली आहे, असे पठाणमथिट्टा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
डीआयजी अजीथा बेगम जे या तपासाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी सांगितलं की या कथित बलात्काराच्या प्रकरणात ३० एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारीमध्ये नावे असलेल्या ५९ जाणांपैकी ४४ जणांना अटक करण्यात आली आहे.
“दोन आरोपी हे सध्या फरार आहेत. ते सध्या परदेशात आहेत. आम्ही लूक आऊट नोटीस जारी करण्याचा विचार करत आहोत. तसेच इंटरपोलच्या माध्यमातून त्यांच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची देखील आमची योजना आहे”, असेही पोलीस अधिकार्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. याशिवाय १३ इतरांना अटक केली जाईल असेही त्या म्हणाल्या.
आम्ही त्यांच्या ठिकाणांचा शोध घेत आहोत. त्यांना लवकरच अटक केली जाईल. एसआयटीकडून काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही एकाही आरोपीला सोडणार नाही, या प्रकरणी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही या सर्वांना न्यायालयासमोर आणू , असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अनेक आरोपी हे या पीडित मुलीला पठाणमथिट्टा येथील खाजगी बस स्टँडवर भेटले. त्यानंतर तिला वाहनाने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
पीडित तरुणी गेल्या वर्षी बारावीच्या वर्गात शिकत असताना तिच्याशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणाने तिला रन्नी येथील रबर मळ्यात घेऊन गेला आणि त्याने इतर तिघांसह तिच्यावर बलात्कार केला, अशी माहितीही पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या तरुणीवर किमान पाच वेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. ज्यामध्ये कारमध्ये आणि २०२४ मध्ये पाथानामथिट्टा येथील जनरल हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकाराचाही समावेश आहे.
सध्या या मुलीचे वय १८ वर्ष असून तिच्या तक्रारीनुसार तीचं वय १३ वर्ष असल्यापासून तिच्यावर ६२ जणांनी अत्याचार केले आहेत.
प्रकरण बाहेर कसं आलं?
महिला समक्य नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्या नियमित क्षेत्र भेटीचा भाग म्हणून मुलीच्या घरी पोहोचल्यावर ही बाब उघडकीस आली. मुलीने पाच वर्षांमध्ये अनुभवलेल्या भयावहतेचे कथन केले. त्यानंतर एनजीओने पथनामथिट्टा जिल्ह्यातील बालकल्याण समितीकडे याची तक्रार केली. CWC ने मुलीला समुपदेशन दिले आणि तिने मानसशास्त्रज्ञांसमोर खुलासा केला. तिच्या समुपदेशन सत्रादरम्यान, मुलीने दावा केला की ती केवळ १३ वर्षांची असताना तिच्या शेजाऱ्याने तिच्यासोबत पॉर्न व्हिडिओ दाखवून अत्याचार सुरू केले.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामध्ये पठाणमथिट्टाचे डेप्युटी एसपी पीएस नंदकुमार हे जिल्हा पोलीस प्रमुख व्हीजी विनोद कुमार यांच्या देखरेखीखाली टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीममध्ये महिलांसह ३० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीआयजी अजिता बेगम यांनी सांगितले की, सबरीमाला यात्रेचा हंगाम संपल्यानंतर एसआयटीमध्ये आणखी अधिका-यांचा समावेश केला जाईल.