राजधानी नवी दिल्लीतील केरळ हाऊस या सरकारी अतिथीगृहाने आपल्या मेन्यूकार्डमधून गोमांस हा शब्दच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिथीगृहामध्ये गोमांस मिळत असल्याची तक्रार कट्टर हिंदूत्त्ववादी संघटना हिंदू सेनाने केल्यामुळे दिल्ली पोलीसांचे पथक सोमवारी केरळ हाऊसमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर मेन्यूतून हा शब्दच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीतील जंतर-मंतरजवळ असलेल्या केरळ हाऊसमध्ये गोमांसाचे पदार्थ दिले जातात, अशी तक्रार हिंदू सेनेने दिल्ली पोलीसांकडे केली होती. संपूर्ण दिल्लीमध्ये गोमांसवर बंदी असल्यामुळे या तक्रारीवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिल्ली पोलीसांचे पथक या अतिथीगृहामध्ये दाखल झाले. हे सरकारी अतिथीगृह असल्यामुळे तिथे आत जाऊन तपास करता येणार नाही, असे अतिथीगृहातील अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी केरळ हाऊसच्या प्रवेशद्वारावरच तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमच्या अतिथीगृहात देण्यात येणाऱ्या सर्व मांसाहारी पदार्थांसाठी दिल्ली सरकारने अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांतूनच मांस मागविले जाते. गोमांस इथे आणलेच जात नाही, अशी माहिती अतिथीगृहातील अधिकाऱ्यांनी पोलीसांना दिली. त्याचवेळी गोमांस हा शब्दच मेन्यूकार्डमधून काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केरळ हाऊसच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.