केरळमध्ये दोन महिलांचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. येथील एका जोडप्यानं झटपट श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी महिलांचा नरबळी दिला आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडेही या जोडप्यानं खाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी जोडपे आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे.
भागवल सिंह आणि त्याची पत्नी लैला आणि रशीद उर्फ मोहम्मद शफी, असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तर, रोझलिन आणि पद्मा, असं नरबळी देण्यात आलेल्या दोन मृत महिलांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोझलिन आणि पद्मा या दोन्ही महिला केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील रहिवाशी होत्या. रोझलिन या जूनमध्ये तर पद्मा सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्या होत्या. मृतांच्या नातेवाईकांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता दोन्ही मृत महिलांचं शेवटचं मोबाईल लोकेशन रशीद उर्फ मोहम्मद शफी याच्या घरी आढळलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा – “भारतातील कारागृहात माझी हत्या होईल, अथवा आपण आत्महत्या करू”
शफीने भागवल सिंह आणि त्याची पत्नी लैलाला आर्थिक चणचण कमी व्हावी आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी नरबळी देण्यास सांगितले होते. त्यानुसार शफी यानेच दोन्ही महिलांचं अपहरण करून त्यांना मारेकरी जोडप्याच्या घरी घेऊन गेला होता. भागवल सिंह आणि लैला हीने त्या दोघींचा छळ करून गळा दाबत खून केला. त्यानंतर त्या महिलांचे ५६ तुकडे करून खड्डात पुरले. आरोपी भगवंत आणि त्याच्या पत्नीने मृतदेह केलेल्या मांसाचे तुकडे खाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा – ईडीचे अधिकारी घरात घुसले तेव्हा नेमकं काय घडलं? संजय राऊतांनीच सांगितला घटनाक्रम
दरम्यान, भागवल सिंह सीपीआईएम पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, पक्षाकडून यावरती स्पष्टीकरण देत आरोपांचे खंडण केलं आहे. पक्षाचे नेते पीआर प्रदीप यांनी म्हटलं की, “भागवल सिंहने आमच्यासह काम केलं होते. मात्र, तो पक्षाचा अधिकृत सदस्य नाही आहे. भागवल प्रगतिशील होता, पण दुसऱ्या लग्नानंतर तो धार्मिक बनला.” एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.