केरळमधील इस्लामिक धर्मगुरू एपी अबूबकर मुसलियार यांनी केलेलं एक विधान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. त्यांनी महिला आणि पुरुषांनी एकत्र व्यायाम करण्याच्या पद्धतीचा विरोध दर्शविला आहे. उत्तर केरळमध्ये “मल्टी एक्सरसाइज कॉम्बिनेशन ७” (MEC 7) हा एक लोकप्रिय फिटनेस कार्यक्रम सुरू आहे. यातून महिला आणि पुरुष एकत्र येत व्यायाम करतात. अबुबकर मुसलियार यांनी मलप्पुरम येथील सभेत बोलताना म्हटले की, व्यायामाच्या नावावर छोटे गाव आणि शहरांमधून सामूहिक अभियान सुरू आहे. व्यायाम करणाऱ्या महिलांचं अंगप्रदर्शन होत आहे. महिला आणि पुरुषांनी एकमेकांना असे पाहणे हराम असते.

अबुबकर मुसलियार पुढे म्हणाले, “अशा सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनोळखी महिला पुरुषांना मुक्तपणे भेटत आहेत. अंगप्रदर्शन करत महिला व्यायाम करत आहेत. या बाबीमुळे लोक इस्लामपासून दूर जात आहेत आणि सामाजिक मूल्यांना मोठे नुकसान पोहोचत आहे.” भूतकाळात महिला इस्लामी कायद्यांचे पालन करत होत्या. त्यावेळी पुरुषांशी संभाषण करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक होते. मात्र या प्रथा आता पाळल्या जात नाहीत. एमईसी ७ हे युवकांना हरामच्या मार्गावर नेत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

अबुबकर मुसलियार यांच्या विधानानंतर आता त्यांच्यावर राजकीय आणि सामजिक क्षेत्रातून टीका होऊ लागली आहे. केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी या विधानाचा निषेध केला. त्यांचे हे विधान प्रतिगामी आहेच. शिवाय ते लिंगभेद करणारे असून त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. आपण २१ व्या शतकात राहत आहोत. तरीही काही लोक जुनाट कल्पनांना कवटाळून बसलेले आहेत.

MEC-7 फिटनेस कार्यक्रमावर ही पहिली टीका नाही. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सीपीआय (एम)चे नेते यांनी या फिटनेस कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जमात इस्लामिक नेशनच्या प्रचारासाठी याचा ढालीप्रमाणे वापर करत असल्याचे ते म्हणाले होते.

Story img Loader