दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी हाथरसला जाणारे केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) त्यांना अटक करण्यात आली. तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अन्य एक गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने अखेर कप्पन यांना जामीन मंजूर केला आहे. मागील दोन वर्षांपासून ते तुरुंगात होते.
खरं तर, बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात सिद्दीक कप्पन यांना सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर केला होता. पण ते लखनऊच्या तुरुंगातच होते. कारण २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा अन्य एक गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातही कप्पन यांना आज जामीन मंजूर झाला.
या महिन्याच्या सुरुवातीला लखनऊ उच्च न्यायालयाने सिद्दीक कप्पन यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग’ कायद्यांतर्गत (पीएमएलए) आरोप निश्चित केले होते. म्हणजेच डिसेंबरच्या सुरुवातीला न्यायालयीन खटला सुरू झाला. केए रौफ शेरीफ, अतिकुर रहमान, मसूद अहमद, मोहम्मद आलम, अब्दुल रज्जाक आणि अश्रफ खदीर अशी अन्य आरोपींची नावं आहेत.
पोलिसांच्या दाव्यानुसार, संबंधित सर्व आरोपी भारतात बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेची विद्यार्थी शाखा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ (CFI) चे सदस्य आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ते पीएफआयच्या निर्देशानुसार हाथरसला जात होते.
पण सिद्दीक कप्पन आणि त्यांच्या वकिलांनी वारंवार दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा दावा नाकारला. कप्पन हे केवळ वार्तांकन करण्यासाठी हाथरसला जात होते, असा युक्तीवाद कप्पन यांच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कप्पन यांना दिलासा दिला. त्यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.