Kerala Madarasa Teacher Sexual Assault Case: केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील मदरशामध्ये शिक्षक असलेल्या एका व्यक्तीला १८७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. करोना महामारीच्या काळात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कन्नूर जिल्ह्यातील तालिपरंबा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी पोक्सो कायद्याअंतर्गत ही शिक्षा सुनावली गेली. आरोपी मुहम्मद रफी हा अलकोडे येथील रहिवासी असून त्याला ९ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२१ या काळात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. रफीने अल्पवयीन मुलीला अंगठी दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि मग तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. सदर प्रकरणी पझयांगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की, आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. याआधीही त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केला होता. वलापट्टणम पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पूर्वी पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामीन मिळाला असताना त्याने कन्नूर जिल्ह्यात दुसरा गुन्हा केला.
मुहम्मद रफीला १८७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी भारतीय कायद्यानुसार त्याला ३० वर्ष कारावासात घालवावी लागू शकतात. तसेच त्याच्याकडून वसूल करण्यात आलेला दंड पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले.
फेब्रुवारी महिन्यात बंगळुरूच्या हेगडे नगर येथे असाच एक प्रकार निदर्शनास आला होता. येथील एका मदरश्यात ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. १६ फेब्रुवारी रोजी वसतिगृह प्रमुखाचा मुलगा मोहम्मद हसन हा अल्पवयीन मुलीला लाथा-बुक्याने मारहाण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला होता. तसेच भात सांडल्याच्या कारणावरून त्याने इतर मुलींशी वाद घातल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.
आरोपी हसन हादेखील अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली असून बाल सुधार कायदे आणि भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.