man murders ex girlfriends brother in front of their parents Crime News : केरळमधील कोल्लम शहरात एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या भांडण झालेल्या गर्लफ्रेंडच्या भावाची त्याच्या आई-वडिलांसमोर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हत्येनंतर आरोपीने देखील आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार. तेजस राज हा तरूण त्याच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्यापासूनच तिच्या पालकांवर नाराज होता. तसेच मुलीच्या पालकांनी तिचे लग्न दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर निश्चित केले होते.
सोमवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास, राज कोल्लमच्या उलियाकोवी भागात असलेल्या महिलेच्या घरी गेला आणि त्याने फेबिन जॉर्ज गोमेझ (२१) याला चाकूने भोसकून ठार मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फेबिनचे वडील जॉर्ज देखील जखमी झाले.
या हत्येच्या घटनेनंतर राज हा कारने सुमारे तीन किलोमीटर अंतरावर गेला आणि रेल्वे रुळाजवळ थांबून त्याने आत्महत्या केली. या घटनेवेळी त्याने काळे कपडे परिधान केले होते आणि चेहरा काही प्रमाणात झाकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्याच्या कारमधून पेट्रोलने भरलेल्या बाटल्या देखील जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. राज हा एका पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा होता अशीही माहिती समोर आली आहे.
हत्या झालेल्या फेबिनची बहीण आणि राज हे दोघे एकाच वर्गात होते, उच्च माध्यमिक शिक्षण आणि इंजिनियरिंग कोर्स देखील दोघांनी एकाच संस्थेतून पूर्ण केला.
पोलिसांनी काय सांगितलं?
“दोघे वेगवेगळ्या समाजाचे होते तरी त्यांच्या कुटुंबियांचा नात्याला विरोध नव्हता. मात्र असले तरी महिलेला एका चांगल्या बँकेत नोकरी मिळाली, पण तेजस पोलीस काँस्टेबल पदासाठीच्या लेखी परीक्षेत पास झाला पण शारीरिक परीक्षेत तो नापास झाला. यामुळे तो नैराश्यात गेला आणि महिला नात्यातून दूर जाऊ लागल्याचे सांगितले जाते. महिलेने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने तिच्या कुटुंबियांनी देखील त्याला महिलेच्या पाठीस लागण्यापासून रोखण्यास सुरूवात केली. यामुळे चिडून हत्या झाल्याचे दिसते,” असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले.
एफआयआरमध्ये फेबिनच्या आईने पोलिसांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न दुसर्या व्यक्तीशी ठरवल्यानंतर राजने त्यांच्याविरूद्ध मनात राग धरला. तसेच त्यांनी आरोप केला की राज त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या पालकांना तसेच त्यांचा मुलगा फेबिन यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरी आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी राज याने फेबिनच्या वडील जॉर्ज यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर त्याने फेबिन याला गंभीर जखमी केले. सीसीटीव्ही फुटेजनुसार चाकूने वार केल्यानंतर फेबिन घरातून बाहेर पळताना आणि रस्त्यावर कोसळताना दिसत आहे. त्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी काळ्या कपड्यात पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली, त्यानंतर जवळच्याच परिसरात अशाच कपड्यांमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
कॉलेजात शिक्षण घेणारा फेबिन हा डिलिव्हरी मॅन म्हणून पार्ट टाईम काम करत होता. तर त्याचे वडील हे कोल्लमधील एका रुग्णालयात ड्रायव्हर म्हणून काम करतात.