Kerala Rape Case 141 Years Jail : केरळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या सावत्र मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एक व्यक्तीला फास्ट ट्रॅक न्यायालयाने १४१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी घरात नसताना सावत्र मुलीला धमकी देत तिच्यावर २०१७ पासून सातत्याने बलात्कार करायचा. फास्ट ट्रॅक न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्रफ ए. एम. यांनी त्या व्यक्तीला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायद्याच्या विविध तरतुदींनुसार एकूण १४१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
२४ साक्षीदार, १२ कागदपत्रांची तपासणी
दरम्यान या प्रकरणातील व्यक्तीला विविध गुन्ह्यांमध्ये १४१ वर्षांचा कारावास ठोठावला असला तरी, आरोपीला कायद्याच्या तरतुदींनुसार ४० वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहात ठेवता येणार नाही. या प्रकरणात मल्लपुरमच्या मंजेरी न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी ही शिक्षा सुनावली होती. यावेळी न्यायालयाने या व्यक्तीवर ७ लाख ८५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांनी २४ साक्षीदार आणि १२ कागदपत्रे सादर केल्यानंतर न्यायालयाने याची तपासणी केली आणि आरोपीला शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील पीडित मुलीवर सावत्र बाप २०१७ पासून सातत्याने बलात्कार करत होता. शेवटी मुलीने हा सर्व प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार पीडितेने याबाबत आईला सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
काय आहे नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील पीडित मुलगी आणि आरोपी मूळचे तामिळनाडूचे आहेत. मुलीचा सावत्र बाप २०१७ पासून सातत्याने पीडितेवर बलात्कार करायचा. मुलीची आई घराबाहेर पडली की, आरोपी मुलीला आणि आईला जीवे मारेन अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करायचा. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने याबाबत आपल्या मैत्रीणीला सांगितले. त्यानंतर मैत्रिणीने हा सर्व प्रकार आईच्या कानावर घालण्यास सांगितले. पीडितेने याबाबत आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
जामिनावर सुटका
या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला केरळ पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांनी आरोपीची जामिनावर सुटका झाली. या नराधमाने जामिनावर सुटका झाल्यानंतरही पीडीत मुलीवर पुन्हा एकदा बलात्कार केला. त्यानंतर २०२२ मध्ये आरोपीवर बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आली होता. आता या प्रकरणी न्यायालयात वेगळा खटला सुरू आहे.