Kerala Medical College Ragging : केरळमधील एका सरकारी नर्सिंग महाविद्यालयामध्ये रॅगिंगचा एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या कॉलेजमध्ये तृतीय वर्षाच्या नर्सिंगच्या पाच विद्यार्थ्यांनी काही ज्युनियर विद्यार्थ्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले असून आता याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) देखील घेतली आहे. आयोगाने ही घटना नैतिकदृष्ट्या निंदनीय आणि मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर आयोगाने केरळच्या पोलिस महासंचालकांकडून (डीजीपी) दहा दिवसांत या प्रकरणात सविस्तर कारवाई अहवाल मागितला आहे.
गुरुवारी या कॉलेजमधील रॅगिंगचा भयानक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये काही कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना बेडला बांधून त्यांच्या शरीरावर कंपासने भोकसले जात असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पीडित विद्यार्थ्यांबरोबर भयानक कृत्य करण्यात आली. आरोपी विद्यार्थ्यी प्रथम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांना नग्न करायचे आणि त्यांना कंपास बॉक्समधील वस्तूंनी मारहाण करायचे. या पीडित विद्यांर्थ्यांना जवळजवळ तीन महिने क्रूरपणे मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्यांच्या गुप्तांगाला डंबेल्स देखील बांधले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर पाच आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
एनएचआरसीने तक्रारीच्या आधारे नमूद केले की वायनाड, मलप्पूरम आणि कोट्टायम येथील विद्यार्थी कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भाग पाडत होते आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ देखील करत होते. विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याचा तसेच त्यांना धारदार शस्त्रांनी जखमा करण्यात आल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांवर करण्यात आला आहे. “हे कृत्य फक्त नैतिकदृष्ट्या निंदनीय नाहीत तर बेकायदेशीर देखील आहेत, असल्याचे एनएचआरसीने त्यांच्या कार्यवाहीत नमूद केले आहे.
पाच जणांना अटक
एका पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर सॅम्युअल जॉन्सन (२०), राहुल राज (२२), जीव (१८), रिजिल जित (२०) आणि विवेक (२१) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांना आणखी विद्यार्थांचा छळ झाल्याचा संशय आहे. आरोपींवर रॅगिंग प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही क्रूर घटना केरळच्या कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग महाविद्यालयामध्ये घडली आहे. या प्रकरणातील प्रथम वर्षाच्या तीन पीडित विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती. हे तिन्ही विद्यार्थी तिरुवनंतपुरम येथील आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर त्यांच्याबरोबर, नोव्हेंबर २०२४ पासून सुरू असलेल्या हिंसक कृत्यांचा खुलासा झाला. या तक्रारीनंतर आरोपी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले असून, रॅगिंग विरोधी कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.