पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप झाल्यानंतर केरळमधील सत्ताधारी यूडीएफ आघाडीतील वनमंत्री के. बी. गणेशकुमार यांनी सोमवारी रात्री आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गणेशकुमार यांच्या पत्नीने त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी पोलिसांनी घरगुती हिंसा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे गणेशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिस चौकशीनंतर सत्य काय आहे, ते बाहेर येईलच. मात्र, आता मंत्रिपदावर कायम राहून मी मुख्यमंत्री ओमन चंडी यांना अडचणीत आणू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशकुमार आणि त्यांची पत्नी ड़ॉ. यामिनी थानकाची यांच्यातील बिघडलेल्या वैवाहिक संबंधांमुळे निर्माण झालेले नाट्य सोमवारी केरळमधील जनतेने पाहिले. सुरुवातीला गणेशकुमार यांनी तिरुअनंतपुरममधील कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या पत्नीकडून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. पत्नीने माझ्या शत्रूंशी हातमिळवणी केली असून, ती माझा छळ करीत असल्याचा आरोप त्यांनी अर्जामध्ये केला.
गणेशकुमार यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पतीविरोधात तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडेही घरगुती हिंसाचार कायद्याखाली गुन्हा दाखल केला. पत्रकारांशी बोलताना अनेकवेळा डॉ. थानकाची यांना अश्रू अनावर झाले. गणेशकुमार यांचे त्यांच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या १६ वर्षांपासून पती माझ्यावर अत्याचार करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader