राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडून देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर छापेमारी केली जात आहे. ज्याच्या निषेधार्थ PFI ने परवानगीशिवाय केरळ बंदचे आयोजन केले होते. या केरळ बंदला उच्च न्यायालयाने बेकायदेशीर म्हटले आणि पीएफआयला फटकारले. असे असतानाही केरळभर हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड आणि बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. एवढंच नाहीतर कन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आला. त्याचवेळी तामिळनाडूमध्ये निदर्शने झाली आणि कोईम्बतूर येथील भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

केरळपासून तामिळनाडूपर्यंत हिंसाचार –

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांच्या आवाहनावर राज्यभर निदर्शने आणि हिंसाचारासाठी बाहेर पडले आहेत. एनआयएच्या कारवाईच्या विरोधात ही निदर्शने आयोजित करण्यात आली होती, मात्र त्यात भीषण हिंसाचार झाला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एनआयएने देशभरातील पीएफआयच्या कार्यालयांवर, ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ज्याला पीएफआय कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. केरळमध्ये पीएफआयचे राज्य सरचिटणीस ए अब्दुल सत्तार यांनी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत निदर्शने आणि संपाची घोषणा केली होती.

पोलिसांवरही हल्ला केला –

केरळमध्ये पीएफआय बंददरम्यान कार्यकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आहे. कोल्लम जिल्ह्यातील पल्लिमुक्कू येथे पीएफआय समर्थकांनी दोन पोलिसांवर हल्ला केला. त्याचवेळी कन्नूरच्या मत्तनूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. दरम्यान, केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे. बंदला बेकायदेशीर ठरवत केरळ उच्च न्यायालयाने हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणात परवानगीशिवाय राज्यात बंद पुकारणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. बंदला पाठिंबा न देणाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

Story img Loader