देशातील पहिला रोबोट पोलीस अर्थात रोबो-कॉप ‘केपी-बॉट’ केरळ पोलिसांच्या सेवेत दाखल झाला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ‘केपी-बॉट’चे उद्घाटन केले.
केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला असून तो पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून ड्युटी करणार आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे मानवी रुप असलेला हा रोबो एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जागी काम करणार आहे. तो पोलीस मुख्यालयात आलेल्या लोकांचे स्वागत करेन आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्गही सांगेल.
पोलिसांच्या कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारतीय राज्यांचे नेतृत्त्व करणारे केरळ पोलीस मानवी रोबोच्या वापराने ऐतिहासिक कामगिरी करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री विजयन उद्घाटनानंतर म्हणाले.
केपी-बॉट हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे.
पोलिसांच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी केपी-बॉटचा मोठा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.