केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात आंदोलन करताना हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी २०१६ लोकांना ताब्यात घेतले आहे. तर ४५२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी ही माहिती दिली.


बेहरा म्हणाले, आम्ही सुमारे ४५० लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर सुमारे २००० लोकांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचार केल्याप्रकरणी इतर अनेकांचीही ओळख पटली असून आणखी लोकांना ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करताना महिलांना मंदिरात प्रवेश देताना सुरक्षा पुरवण्यासाठी काय करता येईल, यासाठी पोलीस कमिटीकडून सूचना मागवण्यात येत आहेत. याबाबत अद्यापही चर्चा सुरु असून आम्ही कुठल्याही निर्णयाप्रत आलेलो नाही, असेही पोलीस महासंचालक बेहेरा यांनी सांगितले.

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशापासून रोखता येणार नाही असा आदेश नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर या निर्णयाविरोधात शबरीमला मंदिर परिसरात अनेक हिंदू संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात आला. आंदोलकांनी या मंदिरात महिलांना जाण्यापासून रोखले. प्रसंगी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली होती. या घडामोडीत मंदिराचे दरवाजे ठराविक काळानंतर बंद झाल्याने महिलांना या मंदिरात प्रवेश करता आला नाही.

Story img Loader