भूस्खलनामुळे उत्तराखंडमधील जोशीमठ येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, याच शहरातील लोकांच्या मदतीसाठी वेगवेगळे सामान घेऊन जाणाऱ्या एका पादरीचा खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे पुजारी मूळचे केरळचे होते. ते जोशीमठ येथील लोकांना मदत म्हणून ३०० किमीचा प्रवास करून आपल्या कारमध्ये काही सामान घेऊन आले होते. गुरुवारी (१९ जानेवारी) ही घटना घडली असून मृत पादरीचे नाव फादर मेलवीन अब्राहम पाल्लिथाझाथू (३७) असे आहे.
हेही वाचा >> शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कोण हवं? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? संतोष बांगर स्पष्टपणे म्हणाले, “आम्हाला तर…”
मिळालेल्या माहितीनुार मृत पादरी मेलवीन अब्राहम हे मूळचे केरळच्या कोझीकोड जिल्ह्यातील रहिवासी होते. जोशीमठमधील लोकांना मदत करावी म्हणून त्यांनी एकट्यानेच जीपने उत्तराखंडमधील कोटद्वार ते जोशीमठ असा ३०० किलोमीटरचा प्रवास केला. पुढे त्यांच्यासोबत एक पुजारी आणि आणखी एक व्यक्ती जीपमध्ये बसली. तिघेही भूस्खलामुळे जीवनावश्यक वस्तूंची गरज असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी निघाले होते.
मात्र बर्फाच्छादित रस्त्यावरून जाताना त्यांचे वाहन अडकले. तिघांनीही वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यानंतर मेलवीन अब्राहम यांनी सोबत असलेल्या दोघांना खाली उतरून वाहन बाहेर काढण्यासाठी सूचना कराव्यात असे सांगितले. यावेळी गाडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना ती खोल दरीत कोसळली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा >> कर्नाटकात जाऊन देवेंद्र फडणवीसांची थेट कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले…
दरम्यान, हा प्रवास सुरू करण्याअगोदर त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये “सध्या सकाळचे दहा वाजले आहेत. मदतीसाठीचे सामान घेऊन सध्या मी पर्वत चढत आहे. सध्या स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. वातावरणही छान आहे. धुके नाहीये. सर्वकाही मस्त आणि आनंदी आहे,” असे ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. मदतीसाठी ३०० किमीचा प्रवास करणाऱ्या अब्राहम यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.