केरळला मुसळधार पावसाने झोडपले असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यात पावसामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपातकालीन समयी केंद्र सरकारकडून केरळला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले. तर कर्नाटकनेही केरळला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

केरळला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जण मृत्यमुमुखी पडले आहेत. यातील ११ जण इडुक्कीत दरड कोसळल्याने ठार झाले. इडुक्कीच्या अडिमाली शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर मलप्पुरममध्ये सहा, कन्नूरमध्ये दोन आणि वायनाड जिल्ह्यात एक जण ठार झाला आहे.

राज्यातील पूरस्थिती गंभीर आहे, राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी २२ धरणांचे दरवाजे उघडावे लागले, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली. एनडीआरएफच्या सहा तुकड्या केरळमध्ये पोहोचल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. सैन्याच्याही तीन तुकड्या मदतीसाठी केरळमध्ये पोहोचल्या आहेत.

अतिवृष्टीचा परिणाम केरळमधील विमानसेवेवरही झाला असून पूरस्थिती पाहता अमेरिकेनेही भारतात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. केरळमध्ये फिरणे टाळावे, असे यात म्हटले आहे.