Kerala Arrested Of Half Price CSR Scam : केरळमधील कोची येथे २६ वर्षीय तरुणाने स्कूटर, घरगुती वस्तू आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विकण्याचे आमिष दाखवून लोकांची २० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत असून, लोकांच्या लुबडलेल्या पैशातून मजा मारत आहे. जेव्हा पीडित लोकांना पैसे देऊनही वस्तू मिळेना झाल्या तेव्हा त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी थेट पोलिसांना गाठले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच इतर ६ आरोपींविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी असा घालायचा गंडा

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२२ पासून, मुख्य आरोपी अनंतू कृष्णन मोठ्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या मदतीने अर्ध्या किमतीत दुचाकी, शिलाई मशीन इत्यादी देण्याचे आश्वासन देऊन लोकांना फसवत होता. तो ‘मुवट्टुपुझा सामाजिक-आर्थिक विकास संस्था’ नावाची संस्था स्थापन करून लोकांकडून पैसे गोळा करत असे. याशिवाय, त्याने अनेक सल्लागार कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांच्यामार्फत पैशाचे व्यवहार केले. लोकांना फसवण्यासाठी तो स्वतःची ओळख ‘नॅशनल एनजीओ फेडरेशन’चा राष्ट्रीय समन्वयक अशी करून द्यायचा. तो लोकांना पटवून द्यायचा की, त्याला भारतातील अनेक कंपन्यांच्या सीएसआर निधीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातून तो लोकांना फसवायचा.

एकाच गावत ९ कोटींची फसवणूक

दरम्यान पोलीस तपासात असे दिसून आले की, मुवट्टुपुझामध्ये त्याने लोकांची सुमारे ९ कोटी रुपयांची फसवणूक केली. याशिवाय, त्याने केरळमध्ये ६२ सीड सोसायटींची स्थापना करून लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. त्याच्याविरुद्ध मुवट्टुपुझा आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत आणि फसवणुकीची एकूण रक्कम २० कोटींपेक्षा जास्त आहे.

राजकीय नेत्यांचीही चौकशी

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्या कंपन्यांच्या नावाने कृष्णन फसवणूक करत होता त्यांना हा प्रकार घडत असल्याची कोणतीच माहिती नव्हती. चौकशीदरम्यान त्याने कबूल केले की, त्याला कोणत्याही कंपनीकडून सीएसआर निधी मिळालेला नाही. दरम्यान या घोटाळ्यात काँग्रेस नेते लाली व्हिन्सेंट यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या भूमिकेचाही पोलीस आता तपास करत आहेत. असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.