Temple Practices : पुरुषांनी वरचे कपडे (शर्ट) काढून मंदिरात जाणे ही वाईट प्रथा असून, ती आता थांबवली पाहिजे, अशी मागणी केरळमधील शिवगिरी मठाच्या प्रमुखांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सामाजिक क्रांती होईल, असेही मुख्यमंत्री विजयन म्हणाले आहेत.
काय म्हणाले स्वामी सच्चिदानंद?
शिवगिरी मठात दरवर्षी होणाऱ्या यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वामी सच्चिदानंद म्हणाले, “ही एक वाईट प्रथा आहे. पूर्वी, ही प्रथा (वरचे वस्त्र काढून मंदिरात जाणे) पुनूल (उच्च जातीच्या लोकांनी परिधान केलेला पवित्र धागा) दिसावा यासाठी सुरू करण्यात आली होती. ती प्रथा आजही मंदिरांमध्ये सुरू आहे. ती प्रथा बदलली पाहिजे, अशी श्रीनारायण समाजाची इच्छा आहे. ही वाईट प्रथा आहे यात शंका नाही. श्री नारायण मंदिरांमध्ये ही प्रथा अस्तित्वात नाही. या संदर्भात बदल करणे आवश्यक आहे.”
मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
या यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वामी सच्चिदानंतर यांच्या मताचे समर्थन केले. ते म्हणाले, “स्वामींनी जे मत मांडले त्यामुळे मोठी सामाजिक क्रांती होऊ शकते. स्वामींनी गुरूंची उदात्त परंपरा कायम ठेवणारे मत व्यक्त केले आहे. मला खात्री आहे की, अनेक मंदिरे याचे पालन करतील. कोणावरही सक्ती करण्याची गरज नाही. काळाच्या अनुषंगाने अनेक पद्धती बदलल्या आहेत हे वास्तव आहे. श्रीनारायण चळवळीशी संबंधित मंदिरांनी तो बदल स्वीकारला आहे. मला आशा आहे की इतर मंदिरे देखील हा मार्ग अवलंबतील.”
हे ही वाचा : संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; म्हणाले, “प्रकरणाचा तपास…”
हा मुद्दा उपस्थित करणारे स्वामी सच्चिदानंद हे समाजसुधारक श्रीनारायण गुरु यांनी स्थापन केलेल्या शिवगिरी मठाचे प्रमुख आहेत. समाजसुधारक श्रीनारायण गुरु यांनी “एक जात, एक धर्म, एक देव” या संकल्पनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी स्थापन केलेल्या श्री नारायण धर्म संघमचे मुख्यालय देखील शिवगिरीत आहे.
शिवगिरी मठ केरळमधील मागासलेल्या एझावा हिंदू समाजाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या समाजाचे शिवगिरी मठाला मानतात कारण, श्रीनारायण गुरु यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा देत मागास जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश आणि पूजा करण्याचा अधिकार मिळवून दिला होता.