तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकच्या जयललिता पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जयललिता यांच्या पक्षाला तामिळनाडूतील जनतेने स्पष्ट बहुमत देऊन यावेळी इतिहास घडवला. तामिळनाडूमध्ये दर पाच वर्षांनी खांदेपालट होत असतो आणि तेथील नागरिक एकदा द्रमुकला तर एकदा अण्णा द्रमुकला संधी देत असतात. पण यंदा मतदारांनी पुन्हा एकदा जयललिता यांच्यावर विश्वास दाखवला आणि या ऐतिहासिक विजयाची नोंद झाली. सलग दुसऱयांदा अण्णा द्रमुकची सत्ता तामिळनाडूत येणार आहे.
गुरूवारी सकाळी मतमोजणीत अण्णाद्रमुक आणि द्रमुकमध्ये सुरूवातीला काट्याची टक्कर पाहायला मिळाली होती. पण तासाभरानंतर चित्र अधिक स्पष्ट झाल्यावर अण्णा द्रमुकने मोठी आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला. द्रमुकचे करुणानिधी यांनी काँग्रेससोबत केलेल्या युतीचा कोणताही परिणाम जयललिता यांच्या अण्णा द्रमुकवर झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून जयललिता यांचे अभिनंदन केले.
दुसरीकडे, केरळमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आघाडीला डाव्यांनी जोरदार धक्का दिला. केरळमध्ये डाव्यांनी मोठी आघाडी घेत काँग्रेसला भुईसपाट केले. त्यामुळे केरळमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळेल. मुख्यमंत्री ओमन चंडी यांना मतदारांनी नाकारले. देशात या एकमेव राज्यात पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता येणार आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर केरळमध्ये भाजपलाही खाते उघडण्यात यश आले. भाजपने एका जागेवर विजय मिळवला आहे आहे. मुख्यमंत्री ओमन चंडी शुक्रवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
केरळमध्ये भाजपचा चंचूप्रवेश, राजगोपाल पक्षाचे राज्यातील पहिले आमदार