Kerala Woman Anorexia: डाएटिंग आणि वजन नियंत्रणात कमी करणे, हा आजच्या युगातील कळीचा मुद्दा बनला आहे. जीवनशैली बदलली असल्यामुळे प्रत्येकालाच वजन नियंत्रणात ठेवण्याची कसरत करावी लागते. अनेकजण वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. तर काहीजण इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एका १८ वर्षीय मुलीला वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन सहाय्य घेणे महागात पडले असून डाएटिंगचा अतिरेक केल्यामुळे तिला जीव गमवावा लागला आहे.

केरळच्या कोथूपरंबा येथे राहाणाऱ्या श्रीनंदा हिचा थलासरी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयातही तिच्यावर उपचार केले गेले होते. श्रीनंदाच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती गेल्या काही दिवसांपासून वजन वाढण्याच्या भीतीने जेवण टाळत होती आणि भरपूर व्यायाम करत होती. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील सूचनेनुसार श्रीनंदाने फक्त पाणी घेणे सुरू ठेवले होते. उपाशी राहण्याचा अतिरेक होऊन तिची प्रकृती खालावली.

श्रीनंदा पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थीनी होती. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, श्रीनंदा बहुतेक एनोरेक्सिया नर्वोसाची शिकार झाली असावी. हा आजार एक इटिंग डिसऑर्डर मानला जातो. या प्रकारांमधील व्यक्ती भूक लागल्यानंतर देखील जेवण टाळतात. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचे वजन वेगाने कमी होते. या आजाराने बाधित व्यक्ती कमी वजन असूनही स्वतःला अधिक वजनदार समजतात आणि म्हणून जेवण टाळण्यासाठी ते विविध उपाय राबवत असतात. करोनानंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुमारे पाच ते सहा महिन्यांपासून श्रीनंदाचा हा डाएट सुरू होता. या काळात तिने कुटुंबापासून लपवून जेवण कमी केले होते. नातेवाईकांनी सांगितले की, पालकांनी दिलेले जेवण न खाता श्रीनंदा ही केवळ गरम पाण्यावर गुजराण करत होती. पाच महिन्यांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीनंदा वेळेवर जेवण घेत आहे की नाही, यावर लक्ष ठेवा, असे डॉक्टरांनी श्रीनंदाच्या पालकांना सांगितले होते. तसेच मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेण्याची सूचना त्यांनी दिली होती.

दोन महिन्यांपूर्वी श्रीनंदाला कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून विविध चाचण्या करण्यात आल्या. तिथेही डॉक्टरांनी सकस आहार आणि मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सूचना डॉक्टरांनी केली. तरीही तिची प्रकृती सुधारली नाही. दोन आठवड्यांपूर्वी तिच्या रक्तातील साखर प्रकर्षाने कमी झाली. तसेच तिला श्वासोच्छवासाचाही त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला थलासरी येथील सहकार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Story img Loader