सर्व वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज, बुधवारी संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडले जाणार आहे. मात्र, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना मंगळवारी तिरुअनंतपूरममध्ये एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अयप्पा मंदिर बुधवारपासून महिन्याभराच्या पूजेसाठी उघडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अय्याप्पा मंदिरात दर्शनाची संधी मिळणार असल्याने अनेक महिला भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण त्याचवेळी या निर्णयाविरोधात आंदोलन जोर पकडू लागले आहे.
अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली व महिलांना रोखल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे. महिनाभराची यात्रा राजघराण्याच्या पूजेने सुरू होते; परंतु महिलांच्या प्रवेशास विरोध करणारे मुख्य पुजारी बुधवारी पूजेसाठी न येण्याची शक्यता आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केरळमधील शबरीमाला येथील अयप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यानंतर केरळमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातून यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच आज कोल्लम तुलसी या ज्येष्ठ अभिनेत्याने शबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवे असे धक्कादायक मत व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते. १८ ऑक्टोबरपासून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.