रिसॉर्टसाठी जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपांमुळे केरळमधील परिवहन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थॉमस चंडी यांनी बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या १६ महिन्यांत मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागलेले थॉमस चंडी हे तिसरे मंत्री आहेत.

अलपुझा जिल्ह्यातील कुट्टनाद येथून निवडून येणारे थॉमस चंडी हे अडचणीत आले आहेत. अलपुझा येथे थॉमस चंडी आणि त्यांच्या नातेवाईकाचे लेक पॅलेस रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टकडे जाण्यासाठी रस्ता आणि पार्किंगसाठी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. पाणथळ जागांच्या रक्षणासंदर्भातील नियमावलीचे त्यांनी उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला अहवालही पाठवला आहे..

मंगळवारी केरळ हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाला स्थगिती देण्याबाबत चंडी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळाली होती. तुम्ही सत्तेत असताना सरकारच्याच अहवालाला आव्हान कसे देऊ शकता असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. दुसरीकडे भाजपनेही चंडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर बुधवारी सकाळी चंडी यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांनीही चंडी यांचा राजीनामा मंजूर केला.

थॉमस चंडी हे सर्वात श्रीमंत मंत्री म्हणून ओळखले जातात. राजीनाम्यानंतर चंडी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिवहन खाते राष्ट्रवादीकडेच ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. मी किंवा आमदार ए के ससिंद्रन यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते खाते रिक्त असेल असे त्यांनी सांगितले.