Kerala Students Infected With Norovirus: केरळमधील तिरुवनंतपूरम येथील एका कनिष्ठ प्रथमिक शाळेमधील दोन मुलांना नोरोव्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर उलट्या, डायरिया आणि तापासारखी लक्षणं मुलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. नोरोव्हायरस हा फार संसर्गजन्य आजार आहे. अन्न, पाणी आणि स्पर्शामधून या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होतो.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दोन मुलांव्यतिरिक्त इतर मुलांच्या चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. शाळेत वाटप करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून या मुलांना विषबाधा झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जातेय. या घटनेनंतर माध्यान्ह भोजन सुरक्षित करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, वायनाडमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डझनभर विद्यार्थ्यांना या विषाणूची लागण झाली होती.
नोरोव्हायरस हा सर्वच वयोगटातील लोकांना संक्रमित करतो. हा विषाणू डायरियाचा प्रसार करणाऱ्या रोटाव्हायरससारखाच आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव सामान्यत: क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होम, वसतिगृहे आणि इतर बंद जागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना होतो.
नोरोव्हायरसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उलट्या आणि किंवा अतिसाराचा त्रास होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी हा त्रास सुरु होतो. रुग्णांना मळमळ, पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचाही त्रास होतो. अनेक प्रकरणांमध्ये द्रवपदार्थांचं सेवन कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रासही रुग्णांना होतो.
नोरोव्हायरस हा फारच सांसर्गजन्य आहे. मानवी विष्ठेचा अंश तोंडावाटे शरिरात गेल्यास या विषाणूचा प्राथमिक संसर्ग होतो. या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मारत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.
मात्र या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला बराच त्रास होत असला तरी सामान्यतः त्याचा परिमाण फक्त दोन किंवा तीन दिवस टिकतो. बहुतेकदा तरुण, खूप वृद्ध किंवा कुपोषित नसणारे रुग्ण पुरेशी विश्रांती आणि हायड्रेशनच्या मदतीने या संसर्गावर मात करु शकतात.
या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी काही विशेष खबरदारी देखील फार महत्वाची आहे. यामध्ये शौचालयाचा वापर केल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर वारंवार साबणाने हात धुणे. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात काळजीपूर्वक धुणे महत्वाचे आहे. विषाणूचा संसर्ग झाल्यास पृष्ठभाग हायपोक्लोराईटने निर्जंतुक करुन घेणे आवश्यक आहे. या विषाणूच्या संसर्गाचं रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ चेन रिअॅक्शनद्वारे निदान केले जाते. या आजारावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. संसर्गाचा अती त्रास होतो त्यावेळेस शरीरामधील पाण्याचं प्रमाण कायम राहील याची काळजी घेणं महत्वाचे आहे. अनेक रुग्णांना रीहायड्रेशन फ्लुइड्स इंट्राव्हेनस पद्धतीने द्यावे लागतात.