Kerala Wayanad Landslide Updates : गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरळमध्ये तर पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. या घटनेत दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

हेही वाचा : Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलचा अपघात; १० डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

मेप्पाडी भागात मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारात भूस्खलानाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे चार वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झालं. या घटनेत दोन्हीही भूस्खलानाच्या घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक लोक यामध्ये अडकल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

दरम्यान, भूस्खलानाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आलं असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. तसेच भूस्खलन झालेल्या भागात मदतकार्यासाठी अतिरिक्त एनडीआरएफची टीम देखील दाखल होत असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत जखणी झालेल्या १० ते १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच घटनास्थाळी आरोग्य विभागाचं पथकही दाखल झालं असून बचावकार्यासाठी हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर्सही दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच कोणत्याही मदतीसाठी कंट्रोल रुमही सुरु करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

वायनाडमधील भूस्खलानाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर (ट्विट) पोस्ट करत केंद्र सरकार मदत कार्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “भूस्खलनाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांसोबत आम्ही आहेत आणि जखमींबाबतही प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तेथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल.”