पीटीआय, वायनाड (केरळ) : दोन दिवसांपूर्वी वायनाड जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलनाच्या घटनेत मृतांची संख्या १७७ वर पोहोचली असून यात २५ लहान मुले आणि ७० महिलांचा समावेश आहे. तर २०० नागरिक जखमी झाले आहेत.
दरम्यान, मलबा उचलल्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता मदत व बचाव पथकाने व्यक्त केली आहे. विविध रुग्णालयांमध्ये २३४ नागरिकांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह गुरुवारी दुपारी चूरलमाला येथील भूस्खलनग्रस्त भाग आणि मेप्पाडी येथील एक रुग्णालय व सामुदायिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली व स्थितीचा आढावा घेतला. त्यांच्याबरोबर अलपुझ्झाचे खासदार के.सी. वेणुगोपाल होते.भूस्खलन झालेल्या भागातून अनेक नागरिक बेपत्ता असून मदत व बचाव पथकाला प्रतिकूल परिस्थितीचा सामनाही करावा लागत आहे.
हेही वाचा >>>Ashwini Vaishnaw : लोकसभेत Reel मंत्री म्हटल्यावर रेल्वेमंत्र्यांचा संताप अनावर; म्हणाले, “तुमचं खूप झालं आता…”
भूस्खलन आणि नैसर्गिक आपत्तीच्या वारंवार होणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. यावर एक व्यापक कार्ययोजनेची गरजही आहे. मदत, बचाव आणि पुनर्वसन प्रयत्नांची आम्ही माहिती घेत आहोत. सर्वांनाच मदत करण्याचा प्रयत्न असून यूडीएफ शक्य ती सर्व मदत करण्यास कटिबद्ध आहे.– राहुल गांधी, नेते, काँग्रेस