केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं असून वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत १५६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.
वायनाड जिल्ह्यात झालेल्या या भूस्खलनाच्या घटनेचा तब्बल ४ पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. जे यामध्ये अडकले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी एनडीआरएफची टीम, राज्याचे आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराकडूनही मदतकार्य सुरु आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं.
#WATCH | Kerala: Rescue and search operation underway in Wayanad's Chooralmala after a landslide broke out yesterday early morning claiming the lives of 143 people
— ANI (@ANI) July 31, 2024
(latest visuals) pic.twitter.com/aqAG9uZMEP
हेही वाचा : केरळमध्ये १२३ बळी; वायनाडमध्ये भूस्खलन, १२८ जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत मदत करण्यासाठी २०० पेक्षा जास्त लष्कराचे जवान मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मदतकार्यात पावसामुळे आणि रात्री अंधारामुळे अडथळा येत असल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा सकाळी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या भूस्खलनावेळी काहीजण नदीत वाहून गेल्याचंही सांगितलं जात आहे.
दोन दिवसांचा दुखवटा जाहीर
केरळ सरकारने वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, आजही काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे.
#WATCH | Kerala: Relief and rescue operation underway in Wayanad's Chooralmala after a landslide broke out yesterday early morning claiming the lives of 143 people
— ANI (@ANI) July 31, 2024
(latest visuals) pic.twitter.com/Cin8rzwAzJ
दोन लाख रुपयांची मदत
वायनाड भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.
राहुल गांधी वायनाड दौरा करणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आज वायनाड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते वायनाड भूस्खलनाच्या घटनेची पाहणी करण्याची शक्यता आहे. तसेच नुकसान झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत आढावा घेणार आहेत. याबाबत राहुल गांधी यांनीही केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. तसेच तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत सर्व संस्थामधील मदत कार्यात समन्वय राखला जाईल याची काळजी घेत कोणत्याही मदतीची गरज असेल तर कळवण्यास सांगितलं असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे