Kerala Crime News : दक्षिण केरळमधील कोल्लम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्लममध्ये एका इसमाने कार पेटवली आहे. या कारमध्ये त्याची ४४ वर्षीय पत्नी व तिचा मित्र बसलेले असताना त्याने कार पेटवली. या आगीत त्याच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, तिचा मित्र जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की या प्रकरणातील आरोपीचं नाव पद्मराजन (६०) असं आहे. पद्मराजनने एका कारचा पाठलाग केला, ज्या कारमध्ये त्याची पत्नी होती. रात्री नऊ वाजण्याच्या आसपास कार कोल्लम सिटी ईस्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. त्याची पत्नी ज्या कारमध्ये होती ती कार चेम्मामुक्कू परिसरात थांबली होती. त्याचवेळी पद्मराजन मागून आला आणि त्याने कारवर पेट्रोल टाकून कार पेटवली.
पद्मराजनने कार पेटवल्यानंतर कारमध्ये बसलेली त्याची पत्नी अनिला व तिचा मित्र होरपळून गेले. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनी कारवर पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटात लोकांनी आग विझवून कारमध्ये बसलेल्या दोघांनाही बाहेर काढलं. मात्र पद्मराजनच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तर, तिच्या मित्राला लोकांनी रुग्णालयात नेलं असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
हे ही वाचा >> तक्रारदार मुलगाच निघाला आई-वडील, बहिणीचा खुनी; संपत्तीसाठी २० वर्षीय मुलाचं धक्कादायक कृत्य
पद्मराजनचं पोलिसांसमोर आत्मसमर्पन
दरम्यान, पद्मराजनला कोल्लम ईस्ट पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सांगितलं की ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर, पद्मराजनची ४४ वर्षीय पत्नी अनिलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. पत्नी व तिचा मित्र ज्या कारमध्ये बसले होते ती कार पेटवल्यानंतर पद्मराजनने तिथून पळून न जाता पोलिसांना शरण गेला.