वृत्तसंस्था, तिरुवअनंतपुरम
केरळमध्ये गाजलेल्या शेरॉन राज हत्या प्रकरणात केरळमधील एका न्यायालयाने सोमवारी त्याची प्रेयसी आणि या खटल्यातील मुख्य आरोपी ग्रीष्मा हिला फाशीची शिक्षा सुनावली. ग्रीष्माने ऑक्टोबर २०२२मध्ये २३ वर्षीय शेरॉनची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. तिचा काका निर्मल कुमार हाही गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवास सुनावण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियत्तींकरा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एम बशीर यांनी १७ जानेवारीला भारतीय दंड संहितेचे कलम ३६४ (हत्येसाठी अपहरण), कलम ३२८ (विष देऊन इजा करणे), ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ग्रीष्माला दोषी ठरवले होते. तसेच तिच्या काकालाही पुरावे नष्ट करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवले होते. ग्रीष्माला अपहरणाच्या गुन्ह्यासाठी १० वर्षे आणि तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाच वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावणी आली. शेरॉन तिरुवअनंतरपुरमचा रहिवासी होता.

हेही वाचा:राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका

ग्रीष्माने आपले शैक्षणिक यश, गुन्हेगारी इतिहासाचा अभाव आणि आईवडिलांचे एकुलते एक अपत्य असल्याचे मुद्दे उपस्थित करून शिक्षेत सवलत मिळावी अशी विनंती केली होती. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य पाहताना शिक्षा सुनावताना दोषीचे वय विचारात घेण्याची गरज नाही असे न्यायालयाने ५८६ पानी निकालपत्रात स्पष्ट केले. खुनासंबंधी ग्रीष्माच्या गुप्त आणि पूर्वनियोजित कृत्यांकडे न्यायाधीश बशीर यांनी लक्ष वेधले. आरोपीने काळजीपूर्वक हत्येचे नियोजन केल्याचे न्यायालयाने नमूद केले. निकालानंतर शेरॉनची आई प्रिया यांनी तसेच तपास अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा:Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या खास शुभेच्छा; म्हणाले, “ऐतिहासिक…”

हत्येचा कट

ग्रीष्माच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या इसमाशी ठरवल्यानंतर तिला शेरॉनबरोबरचे नाते संपवायचे होते. त्यासाठी तिने आई आणि काकाबरोबर संगनमत करून हत्येची योजना आखली असे न्यायालयाने सांगितले. तिने आई वडील आणि काका घरी नसताना लैंगिक संबंधाचे आमिष दाखवून शेरॉनला बोलावून घेतले आणि त्याला विष घातलेला आयुर्वेदिक काढा दिला. त्यासाठी आदल्या रात्री तिने फोनवरून दीर्घकाळ त्याच्याशी संभाषण केले होते आणि त्याला घरी येण्यासाठी राजी केले होते. काढा घेतल्यानंतर शेरॉनची प्रकृती झपाट्याने ढासळली आणि २५ ऑक्टोबर २०२२ला अनेक अवयव निकामी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला ग्रीष्माला आणि त्यानंतर तिची आई व काकाला अटक करण्यात आली.

या खटल्यातील दोषी हुशार गुन्हेगार होती, तिने अतिशय बारकाईने या क्रूर खुनाची योजना आखली होती असे न्यायालयाने नमूद केले. – व्ही एस विनीत कुमार, विशेष सरकारी वकील, केरळ

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala woman who killed boyfriend with poisoned drink sentenced to death css