क्रायमियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या रशियाने युक्रेनच्या सीमांवरून आपले सैन्य माघारी बोलवावे आणि तणाव कमी करावा, अशी आग्रही मागणी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी यांनी केली आहे. रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावरॉव्ह यांना केरी यांनी याबाबत कळविले आहे.
युक्रेनमध्ये यापुढे जर काही प्रगती पाहायची आमची इच्छा असेल तर ती म्हणजे केवळ रशियाच्या सैन्याची माघार, असे केरी यांनी लावरॉव्ह यांच्याशी सुमारे चार तास झालेल्या चर्चेनंतर स्पष्ट केले. या फौजांमुळेच युक्रेनमध्ये संभ्रमाचे, भीतीचे वातावरण आहे. मात्र आम्हाला सौहार्दतेचे आणि खुली चर्चा करण्यायोग्य वातावरण अपेक्षित आहे. त्यासाठीच रशियाने आपले सैनिक माघारी बोलाविण्याची गरज आहे, असे केरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
चर्चेचा तपशील
केरी आणि लावरॉव्ह यांच्यात झालेल्या चर्चेत सैन्य तैनातीचे परिणाम, त्यांच्या माघारीची गरज आणि शांतता चर्चेची संभाव्य प्रक्रिया याबद्दल मुक्त चर्चा झाली. संघराज्यांच्या निर्णयाबाबत कोणताही करार करावा किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार ना अमेरिकेला आहेत, ना रशियाला, ते केवळ युक्रेनचे अधिकार आहेत, असेही आपले मत असल्याचे केरी यांनी रशियाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांना सांगितले.