भारत आणि अमेरिका हे २१ शतकातील विकासाच्या क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार असून भारताच्या भूमिकेचा आम्ही आदर करतो, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी गुरुवारी येथे केले.
केरी यांचे येथे आगमन झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांचाही मुद्दा चर्चिला गेला. भारत आणि अमेरिका यांचे संबंध एका वळणावर आले असून हे संबंध वाढीस लागण्यासाठी आता अत्यंत चांगली संधी असल्याचे केरी यांनी नमूद केले. गुप्तचर विभागाने जमा केलेल्या माहितीप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले असून गुप्त टेहळणीप्रकरणी भारताने व्यक्त केलेल्या चिंतेची आम्हाला जाण आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या तत्त्वांवर आधारित तडजोड व्हावी, यासाठी आम्ही भारताचे मन वळविण्याचा प्रयत्न करू, असे जॉन केरी म्हणाले.  मोदी यांचा सप्टेंबर महिन्यात अमेरिका दौरा होणार असून त्यासाठी येत्या आठवडय़ांत सर्वतोपरी तयारी करण्यात येत असल्याचेही केरी यांनी सांगितले.

Story img Loader