संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविण्याची खुमखुमी असलेल्या महासत्ता अमेरिकेचा माज भारताने उतरविला आहे. व्हिसा घोटाळाप्रकरणी अमेरिकेतील उपमहावाणिज्य राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची भारताने गंभीर दखल घेतली. तसेच अमेरिकेच्या राजदूतांबाबतही कडक धोरण स्वीकारले. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या अमेरिकेने भारताची मिनतवारी सुरू केली असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दिलगिरी व्यक्त केली. राजनैतिक शिष्टाचारानुसार केरी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्याशी चर्चा करण्याची गरज होती. मात्र खुर्शिद यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने केरी यांनी थेट विमानातूनच मेनन यांच्याशी संपर्क साधला आणि दिलगिरी व्यक्त केली.
केरी आपला आशियाई दौरा पूर्ण करून अमेरिकेला परतत असताना खोब्रागडे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचले. दोन्ही देशांमधील चांगले संबंध लक्षात घेता अमेरिकेला काळजी वाटू लागली. भारतासोबतचे संबंध बिघडू नये म्हणून केरी यांनी विमानतळावर उतरण्याची वाट न पाहता खुर्शिद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते शक्य न झाल्यामुळे केरी यांनी सर्व शिष्टाचार बाजूला सारत सुरक्षा सल्लागार मेनन यांच्याशी संपर्क साधत झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. गेल्या आठवडय़ातही केरी यांनी भारताच्या परराष्ट्रसचिव सुजाता सिंग यांच्याशीही सर्व राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारत १५ मिनिटे चर्चा केली होती.
दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक बळकट होत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून अमेरिका खबरदारी घेत आहे. त्याचाच परिणाम केरी यांनी राजनैतिक शिष्टाचारांकडे दुर्लक्ष करून भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

देवयानी विरोधातील खटला मागे घ्या
अमेरिकेला भारताची सूचना
नवी दिल्ली : व्हिसा घोटाळाप्रकरणी अमेरिकेतील उपमहावाणिज्य राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात दाखल केलेला खटला त्वरित मागे घ्या, अशा स्पष्ट शब्दात भारताने गुरुवारी अमेरिकेला सांगितले. खोब्रागडे यांना अटक करून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटनेने भारताने संताप व्यक्त केला आणि अमेरिकेबाबतही कडक धोरण स्वीकारले आहे. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना दूरध्वनी केला होता. मात्र त्या वेळी आपले बोलणे होऊ शकले नाही, असे खुर्शिद यांनी सांगितले.
देवयानी खोब्रागडे प्रकरणातील सर्व माहिती मागितली असून अमेरिकेने हे प्रकरण अधिक पुढे नेऊ नये तसेच खोब्रागडेंविरोधातील गुन्हा रद्द करावा, असे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध अतिशय चांगले असून हे प्रकरण अधिक संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.