अयोध्येमधील बाबरी मशिदी पडाण्याच्या श्रेयवादावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये तुफान शाब्दिक संघर्ष सुरु झालाय. विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या बुस्टर सभेमध्ये बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एक शिवसैनिकही त्या ठिकाणी नव्हता असा दावा केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. इतकच नाही तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनाही या वादात उडी घेत फडणवीसांची खिल्ली उडवणारं वक्तव्य केलंय. याच वक्तव्यानंतर आता भाजपाने आदित्य ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.
नक्की वाचा >> “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी…”; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला
प्रकरण काय?
मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलंय. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.
बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
नक्की पाहा हे फोटो >> ‘सरड्यासारखे रंग’, ‘सुपारी’, निवांत सभा अन् नक्कल करत म्हणाले “काय एकदाचं…”; अजित पवारांची राज ठाकरेंविरोधात टोलेबाजी, बॉडीगार्ड्सही लागले हसू
आदित्य काय म्हणाले?
सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅनटीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दिनी झालेल्या दोन्ही सभांचा उल्लेख करत आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढतोय. आम्ही मूळ मुद्द्यांवर काम करतोय. महाविकास आघाडी सरकार हे लोकांची कामं करत आहे. लोकांची चूल कशी पेटती राहील यासाठी आम्ही काम करतोय, असं आदित्य म्हणाले. मात्र राज्यातील विरोधी पक्षातील नेते लोकांची घरं पेटवण्याची कामं करत आहेत, असा टोला आदित्य यांनी लगावला.
फडणवीसांनी आपण बाबरी पाडली तेव्हा अयोध्येमध्ये होतो असा दावा केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असताना आदित्य ठाकरेंनी, “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया नोंदवली.
नक्की वाचा >> ‘फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर…’, शिवसेनेचा राज ठाकरेंवरही निशाणा; म्हणाले, “मतपरिवर्तनामागे नक्की कोणता…”
भाजपाने दिलं उत्तर
आदित्य यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. केशव उपाध्ये यांनी ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ या मथळ्याखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. “आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी, या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरून तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य नाही. हेही स्पष्ट झालंय,” अशी टीका उपाध्ये यांनी या पोस्टमधून केलीय.
“बाकी राम मंदिरासाठी भाजपानं आपली उत्तर प्रदेशसह काही राज्यातील सरकारं पणाला लावली. अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा,” असा सल्लाही उपाध्ये यांनी दिलाय.
राऊतांचाही टोला
दरम्यान, बाबरी प्रकरणावरुन शिवसेनेला सवाल विचारणाऱ्या फडणवीसांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्तर दिलंय. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करत राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले.
शिवसेना नेते खासदार सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, विद्याधर गोखले यांच्यासह अनेक नेते व शिवसेना कार्यकर्ते राममंदिर आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना भवनमध्ये विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. माझी अयोध्या खटल्यात चार वेळा साक्ष झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही शिवसेना नेत्यांवर याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.