गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर गुरुवारी राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवले. भाजपमधून बाहेर पडून ‘गुजरात परिवर्तन पार्टी’स्थापणारे केशुभाई पटेल यांचा आशीर्वाद घेऊन मोदींनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत भाजपची सलग तिसऱ्यांदा सरशी झाली, तर प्रचारादरम्यान मोदी यांच्यावर जहरी टीका करणारे केशुभाई यांच्या पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
मात्र हा राजकीय विरोध दूर सारत पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या केशुभाईंचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ‘निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या मोदी यांनी माझी भेट घेऊन आशीर्वादही मागितले, या यशाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले’, अशी माहिती केशुभाई यांनी दिली.
दरम्यान, मोदी यांनी आपली आई हिरबा हिचेही आशीर्वाद घेतले.    

Story img Loader