गेल्या काही दिवसांपासून Netflix वरील ‘खाकी – दी बिहार चॅप्टर’ या वेबसीरिजची चर्चा सुरू आहे. खऱ्या आयुष्यातील आयपीएस पोलीस अधिकारी अमित लोढा यांच्या जीवनातील घटनांचं या वेबसीरिजमध्ये कथेच्या स्वरूपात सादरीकरण करण्यात आलं आहे. मात्र, ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना दुसरीकडे अमित लोढा यांनाच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या वेबसीरिजच्या लोकप्रियतेवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोढा यांच्यावर त्यांच्या पदाचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अमित लोढा यांचं ‘द बिहार डायरीज’ पुस्तक!
अमित लोढा यांनी ‘द बिहार डायरीज’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांच्या करिअरमधील अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख आहे. यापैकी एका प्रकरणावर बेतलेली खाकी ही वेबसीरिज नुकतीच Netflix वर प्रदर्शित झाली. एका मोस्ट वाँटेड गँगस्टरला बिहार पोलिसांनी कशा पद्धतीन पकडलं, याचं कथानक वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
अमित लोढांवर आरोप काय?
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप अमित लोढांवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी असून आणि सरकारी नोकरीच्या पदावर असताना अमित लोढा यांनी Netflix शी आर्थिक व्यवहार केला, Friday Storytellers या प्रोडक्शन हाऊसशी डील केली. यातून त्यांना आर्थिक फायदा झाला. विभागांतर्गत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अमित लोढा यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्याचंही विभगाकडून सांगण्यात आलं आहे.
या चौकशीच्या आधारावर ७ डिसेंबर रोजी अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.