सुपरस्टार श्रीदेवीचं असं जाणं सगळ्यांना चटका लावून गेलं. परंतु तिच्या मृत्यूसंदर्भात भारतीय प्रसारमाध्यमांनी ज्याप्रकारे बातम्या दाखवल्या त्याचं मात्र चांगलंच हसं होत आहे. या प्रकरणी खलिज टाइम्स या दुबईतल्या वृत्तपत्रानं तर आज पहिल्या पानावर नॅनो एडिट छापलंय आणि भारतातल्या काही प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा असं सांगत कान टोचले आहेत. लोकांची भावना एकानं ट्विटमध्ये व्यक्त केलीय. या ट्विटमध्ये म्हटलंय, “श्रीदेवी अपघाती बुडून गेली असेल मात्र भारतीय मीडिया चुल्लूभर पाण्यात स्वखुशीनं वाहून गेलाय.”

सोशल मीडियामुळे हल्ली प्रत्येकजणच पत्रकार नी एक्सपर्ट झालाय. याची झलक श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी येताच दिसली. तिचा मृत्यू ह्रदय बंद पडल्यामुळे झाल्याची बातमी येताच, बोटोक्स इंजेक्शन्स, कॉस्मेटिक्स सर्जरी आणि वय वाढूनही तरूण दिसण्याच्या हौसेपोटी केलेले उपाय या अंगानं सोशल मीडियवर धुरिणांनी वात आणला. स्ट्रेसफूल लाइफच कसं या सगळ्यासाठी जबाबदार आहे याचेही डोस पाजले जायला लागले. स्टेरॉइड्स कशी जीवघेणी ठरतात आणि जिममध्ये जाणारे अनेकजण कसे याच्या आहारी जातायत हे ज्ञानही जाता जाता दिलं गेलं.

मात्र, सोमवारी दुबई पोलिसांनी मृत्यू प्रमाणपत्र देताना, अपघाती बुडून मृत्यू म्हटलं आणि या सगळ्या थेअरीज बाद झाल्या. पण, ती बाथटबमध्ये पडलीच कशी इथपासून ते हत्याच कशावरून नसेल, ती दारू किती प्यायली होती या अंगानं मीडिया भरभरून वाहू लागला. सुब्रमण्यम स्वामींनी तर दाऊद इब्राहिमचे सिनेअभिनेत्रींशी अनैतिक संबंध असतात त्यावर लक्ष ठेवायला हवं असं सांगत आणखी फाटे फोडले.
सोशल मीडियावरच्या या धुमाकुळात आपण कसं मागं राहून चालेल असी समजूत करून घेत मग हिंदी इलेक्ट्रॉनिक मीडियानं उडी घेतली, ती थेट बाथटबमध्येच!

एबीपी न्यूज, आजतक, महान्यूज आदी वाहिन्यांनी तर स्टुडियोचं बाथरूम करून टाकलं नी मौत का बाथटब सादर करत कहर केला. एका वाहिनीचा अँकर तर चक्क बाथटबमध्ये झोपला नी कसा झाला असेल नक्की मृत्यू? याचं प्रात्यक्षिक त्यानं घडवलं.
व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड झालेले मेसेज खरे असतातच असं नाही, त्या बातम्या तर नसतातच नसतात. हे सर्वसामान्यांना नसेल कळत, परंतु किमान प्रसारमाध्यमांना तर कळायला हवं. पण अशा व्हॉट्स अप फॉरवर्डवरच बेतलेल्या बातम्या होतात आणि मग शेवटी खलिज टाइम्ससारख्या विदेशातल्या वृत्तपत्राला विशेष संपादकीय लिहून संयम बाळगा असे सांगत कान टोचायला लागतात.

थेट निष्कर्षाला कशाला येता, तुम्ही न्यायाधीश कशाला होता, तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्या, तपासणी पूर्ण झाली की कळेलच सत्य काय आहे ते, तोपर्यंत संयम तर बाळगा… असं सांगायची वेळ आली खलिज टाइम्सवर!

Story img Loader