अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर आज खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ला आज ३३ वर्षे पूर्ण झाली. मंदिरात उपस्थित असलेल्या शिख बांधवांनी खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. शिरोमणी अकाली दलाचे अमृतसरचे अध्यक्ष सिमरनजीत सिंग मान हे गेल्या अनेक वर्षांपासून खलिस्तानची मागणी करत आहेत. आज ते आपला संदेश शिख बांधवांना देणार होते. मात्र, सुवर्ण मंदिरात अकाल तख्ताचे ग्यानी गुरूवचन सिंग यांनी आपला संदेश द्यायला सुरूवात केली. ज्यानंतर काही प्रमाणात गोंधळ झाला आणि शिख बांधवांनी खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. गुरूवचन सिंग यांना आम्ही मानत नाही अशी घोषणा शिरोमणी अकाली दलानं काही दिवसांपूर्वी केली होती. ज्याचे पडसाद आजच्या कार्यक्रमात बघायला मिळाले.
१९७३ मध्ये पंजाबच्या आनंदपूर शिख साहेब यांनी एक प्रस्ताव पुढे केला होता. ज्यामध्ये पंजाबला एक वेगळं राज्य म्हणून दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. पंजाबच्या खलिस्तान चळवळीची सुरूवात इथूनच झाली असं मानलं जातं. १९८० साली पंजाबमध्ये ज्या दंगली उसळल्या त्या दरम्यान खलिस्तान राष्ट्राची मागणी शिख बांधवांनी केली होती. १९८१ मध्ये पंजाबला भारतापासून स्वतंत्र करत खलिस्तान असा राष्ट्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. तर १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात हत्यारबंद अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. या अतिरेक्यांना मंदिराबाहेर काढण्यासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू केलं होतं. ज्या ऑपरेशनमध्ये पहिल्यांदाच सुवर्ण मंदिरात सैनिकांनी प्रवेश केला होता. ज्यामुळे शिख बांधवांच्या भावना दुखावल्या.
या ऑपरेशनमध्ये अतिरेक्यांसह जे लोक मरण पावले त्यांची संख्या साडेचारशेच्यावर होती. तर २४८ लोक जखमी झाले होते. एवढंच नाही तर सैन्यदलाचे ८३ जवान मारले गेले होते. ज्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचाही समावेश होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा प्रभाव इतका भयंकर होता की त्यातूनच पुढे इंदिरा गांधी यांच्या शिख अंगरक्षकानीच त्यांची हत्या केली. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या ३३ व्या वर्षी पुन्हा एकदा खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा मंदिरात देण्यात आल्या. ज्यामुळे या जुन्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या ३३ वर्षानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंजाबमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच सैन्य दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आलं होतं. घोषणा दिल्यानंतर लगेचच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत घोषणाबाजी करण्याऱ्यांना पांगवलं. त्यामुळे इतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा