कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कॅनडाच्या सरे प्रांतातील प्रसिद्ध अशा लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात घरावर १४ गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला. गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे आणि सीसीटीव्ही चित्रण गोळा करण्याचे काम सुरू आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, लक्ष्मी नारायण मंदिराने मागच्या महिन्यात खलिस्तानी कट्टरतावाद्यांचा निषेध नोंदविला होता. त्याचाच राग धरून सदर हल्ला करण्यात आला असावा, अशी अटकळ बांधली जात आहे. लक्ष्मी नारायण मंदिर किंवा मंदिराशी संबंधित सदस्यांना लक्ष्य करण्याची ही तिसरी वेळ आहे.
याचवर्षी ऑगस्ट महिन्यात कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर कॅनडातील भारतीय हिंदू समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर भीषण हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा संबंध जुन्या घटनांशी आहे का? याचाही तपास केला जात आहे.
टाइम्स नाऊशी बोलत असताना सतीश कुमार यांनी सांगितले की, ज्या घरावर हल्ला झाला, तिथे त्यांचा मुलगा राहतोय. पोलिस सध्या हल्लेखोरांचा तपास करत आहेत. सदर हल्ला कुणी केला? हे आताच सांगणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी मंदिरांवर हल्ले झाले होते. त्याचा आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी असा काही संबंध असेल हे आताच सांगता येणार नसल्याचे म्हटले.