Gangster Harpreet Sing uppal Murder : कॅनडातल्या एडमॉन्टमध्ये गँगस्टर हरप्रीत सिंग उप्पल आणि त्याच्या ११ वर्षांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कॅनडा पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि जारी केलं आहे. हरप्रीत सिंग उप्पल हा अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात गुंतलेला होता असं पोलिसांनी सांगितलं.
व्हँकुव्हर सनच्या बातमीनुसार हरप्रीत सिंग उप्पल हा ब्रदर्स कीपर या टोळीचा सदस्य होता. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद झाले होते. १९ जूनला सरे या ठिकाणी गुरुद्वाराबाहेर निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आता हरप्रीत सिंग उप्पलची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, एक वाहनाचे आणि दोन संशयितांचं फुटेज जारी केलं आहे.
एडमॉन्टन पोलीस सर्व्हिस (EPS) होमिसाईड सेक्शन स्टाफ सार्जंट रॉब बिलावे यांनी माहिती दिली की, “घटनेचं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे त्यामुळे आम्हाला वाहन आणि संशयितांना ओळखण्यास मदत होईल. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दोन व्यक्ती हरप्रीत उप्पल सिंग आणि त्याच्या ११ वर्षांच्या मुलाच्या हत्येतील संशयित आहेत.”
सीसीटीव्हीत काय दिसतं आहे?
जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे त्यात हे दहशतवादी काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू एसयूव्हीमधून जाताना दिसत आहेत. संशयित उप्पलच्या पांढऱ्या एसयूव्हीकडे धावले, त्यांनी शस्त्र फेकली आणि पळ काढला असं दिसतंय. उप्पल आणि त्यांच्या मुलाला गोळ्या लागल्या. त्यात काही वेळातच त्या दोघांचाही मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा उप्पल आणि त्याचा मुलगा कारमध्ये होते. या दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. हरप्रीत सिंग उप्पल याच्यावर २०२१ मध्येही एका रेस्तराँमध्ये हल्ला करण्यात आला होता. या गोळीबारात उप्पल जखमी झाला होता. आता या हल्ल्यात झालेल्या गोळीबारात उप्पल आणि त्याचा मुलगा दोघांनाही ठार करण्यात आलं आहे.