Khalistani Terrorist threatens Hindu MP : कॅनडा व अमेरिकेत राहून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या, भारतविरोधी कटांमध्ये सहभाग असणाऱ्या गुरपतवंतसिंग पन्नूची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याची मुजोरी इतकी वाढलीय की त्याने कॅनडातील हिंदू नेत्यांना आता खुलेआम धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. त्याने एक व्हिडीओ जारी करून कॅनडामधील भारतीय वंशाचे हिंदू खासदार चंद्र आर्य यांना धमकी दिली आहे, तसेच त्यांना कॅनडा सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. खलिस्तानी दहशतवादी पन्नू याने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की “चंद्र आर्य आणि त्यांच्या समर्थकांसाठी कॅनडात जागा नाही. त्यांनी मायदेशी परत जावं.”
चंद्र आर्य हे कॅनडामधील हिंदू खासदार आहेत. ते सातत्याने कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आवाज उठवत आहेत. कॅनडाच्या संसदेपासून इतर राजकीय व सामाजिक व्यासपीठांवरून ते खलिस्तानी दहशतवादाविरोधात बोलत आहेत, भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवायांवर बोलत आहेत. चंद्र आर्य हे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीचे खासदार आहेत.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की “चंद्र आर्य आणि त्यांच्या समर्थकांसाठी कॅनडात जागा नाही. चंद्र आर्य कॅनडात भारताचा अजेंडा राबवत आहेत, भारत सरकारचा प्रचार करत आहेत. त्यांनी कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतात परत जावं. आर्य व त्यांचे समर्थक खलिस्तान समर्थकांविरोधात काम करत आहेत. कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी शिखांनी त्यांची कॅनडाप्रती असलेली देशभक्ती सिद्ध केली आहे. आम्ही कॅनडाप्रती निष्ठावंत आहोत.”
हे ही वाचा >> Video: “मैं हूँ टॅक्स पेअर, हुआ मेरा मोये मोये”, अर्थसंकल्पावरचे ‘हे’ भन्नाट रील्स पाहिलेत का; तुमचं ‘बजेट’ घडलं की बिघडलं?
खासदार चंद्र आर्य यांचं जशास तसं प्रत्युत्तर
दरम्यान, पन्नूच्या व्हिडीओवर चंद्र आर्य यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, खलिस्तानी लोकांनी एडमोंटनमध्ये (कॅनडामधील एक शहर) हिंदू BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केली. तसेच तणावाची स्थिती निर्माण केली होती. त्यानंतर मी त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला होता. मी त्यांच्या कारवायांचा निधेष केल्यामुळे सिख फॉर जस्टिसचे गुरपतवंतसिंग पन्नू याने व्हिडीओ जारी केला आहे. पन्नू मला आणि माझ्या हिंदू-कॅनेडियन मित्रांना भारतात परतण्यास सांगत आहेत. मात्र मला त्यांना सांगायचं आहे, आम्ही हिंदू लोक जगाच्या वेगवेगळ्या भागातून कॅनडात आलो आहोत. कॅनडा हीच आमची भूमी आहे. कॅनडाच्या सामाजिक-आर्थिक विकासात आम्ही मोठं योगदान दिलं आहे. परंतु, काही खलिस्तानी लोक ही भूमी दूषित करत आहेत.